भक्तीमय वातावरण, अलोट जनसागराच्या साक्षीने आणि उदे..ग अंबे उदे.. च्या गजरात महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि त्र्यंबोली देवीच्या भेटीचा रम्य सोहळा रविवारी अतिव उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यानंतर मृदुला संतोष गुरव या कुमारिकेच्या हस्ते कोहळारुपी राक्षसाचा वध करून कुष्मांड विधी करण्यात आला. कोहळा फोडल्यानंतर कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
नवरात्रोत्सवाची पाचवी माळ ललितापंचमीची म्हणजेच टेंबलाईवाडी येथील त्र्यंबोली देवीच्या यात्रेसाठी राज्यभरातून अनेक भाविक कोल्हापुरात येतात. परंपरेनुसार शाही लवाजम्यासह सकाळी १० वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर देवीची पालखी मंदिराच्या मुख्य दरवाजातून टेंबलाईवाडीकडे मार्गस्थ झाली. पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्या, स्वागत कमानी, पायघडय़ा घालण्यात आल्या होत्या. याबरोबरच आपल्या संपूर्ण ताफ्यासह फुलांनी सजविलेली तुळजाभवानीची पालखी भवानी मंडपातून बाहेर पडली. या पालखीत शिवाजी महाराजांची सोन्याची मूर्ती, तुळजाभवानीच्या चांदीच्या पादुका या पालखीत होत्या. शाहू मिल येथे पालखीचे पूजन आणि आरती निवासी जिल्हाधिकारी अमित सनी यांच्या हस्ते करण्यात आली. पालखीच्या स्वागतासाठी टेंबलाईवाडी सज्ज झाली होती. छत्रपती युवराज मालोजी राजेंच्या हस्ते देवीची पूजा आणि मृदुला गुरव या कुमारिकेचे पूजनही करण्यात आले. आज त्र्यंबोली देवीची सिंहासनारुढ पूजा बांधण्यात आली. सालंकृत पूजा बांधून आपल्या रूपाचं तेजस्वी दर्शन घडवणाऱ्या त्र्यंबोली देवी आणि महालक्ष्मीच्या भेटीचा सोहळा अतिव उत्साहात पार पडला. सखीचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाईने कोहळ्याच्या रूपाने कोल्हासुराचा वध कसा केला, हे तिने त्र्यंबोली देवीला दाखविले. या धार्मिक अख्यायिकेच्या संदर्भाने दरवर्षी ललितापंचमीला त्र्यंबोली टेकडीवर कोहळा फोडण्याचा विधी होतो. या विधीनंतर श्री महालक्ष्मीची पालखी पुन्हा मंदिराकडे मार्गस्थ झाली.
निनावी दानशूर
महालक्ष्मीच्या पालखीबरोबर संपूर्ण लवाजम्यासह पायी यात्रेत सामील झालेल्या, दमल्या भागल्या जिवांना चार घास झुणका भाकरीचे खाऊ घालणाऱ्या एका दानशुराचा हा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. यंदा अंदाजे ५०० भाकऱ्या वाटण्याचा या दानशुराचा हा उपक्रम निवडणुकीच्या काळात प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे आज पहाटे पाच वाजल्यापासून यात्रा संपेपर्यंत मोफत बससेवेची सोय करण्यात आली होती.