सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न डोळ्यात तरळत ठेवत हजारो युवकांनी रात्र थंडीत कुडकुडत आणि दिवस तळपत्या उन्हात घामाने न्हाऊन निघत भरती प्रक्रिया पार पडली. बुधवारी हे चित्र कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या मदानावर दिसत होते. या भरतीसाठी ६ जिल्ह्यांतील तब्बल ५७ हजार तरुणांनी आपली ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे.
यंदा पहिल्यांदाच या भरती प्रक्रियेत ऑनलाइन आणि बायोमॅट्रिक पद्धतीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भरतीत पारदर्शकता तर आली आहे आणि त्याच बरोबर गर्दीवर नियंत्रणही मिळवता आले आहे.
यापूर्वी सन्यात भरती व्हायचं म्हटलं तर मोठय़ा प्रमाणात तरुण यायचे आणि गर्दीवर नियंत्रण राहत नसे, मात्र यंदा महाराष्ट्रात पहिल्यांदाच भरती प्रक्रियेत ऑनलाइन पद्धत वापरल्याने ही प्रक्रिया सुटसुटीत झालेली आहे. सन्यात भरती होत असताना तरुणांच्या शरीरावर किती टॅटू काढले आहेत याची कसून तपासणी केली जात आहे. केवळ हातावरील टॅटू अथवा गोंदण वगळता शरीरावर जर इतर ठिकाणी टॅटू आढळले तर त्या तरुणांना भरती प्रक्रियेतून बाहेर काढण्यात येत आहे.
एखाद्या राउंडमध्ये तरुण कमी पडलेत, तर ते पुन्हा येऊ नयेत या साठी त्यांची बायोमॅट्रिक पद्धतीने नोंदही करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेत दररोज एका जिल्ह्यातील तरुणांना संधी देण्यात येत आहे.