बाजारपेठ, वाहतूक सेवा बंद

कोल्हापूर महापालिका क्षेत्राच्या हद्दवाढीस विरोध करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात गुरुवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या आवाहनाला हाक देत शहरातील व्यवहार बंद ठेवण्यात आले. उलाढाल ठप्प झाल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला. हद्दवाढीस विरोध करणाऱ्या तीन आमदारांच्या नावे शंखध्वनी करत कृती समितीने शिवाजी चौक येथे ठिय्या आंदोलन केले. बंदला काही प्रमाणात हिंसक वळण लागल्याने बंदचे   आवाहन करीत फिरणाऱ्या रॅलीतील आंदोलकांनी ११ रिक्षा, १ एस.टी, वडाप सह दुकांनाची मोडतोड केली.

महापालिका हद्दवाढीचा विषय गेल्या तीन दिवसापासून नव्याने तापला आहे. हद्दवाढीला विरोध करणाऱ्या १७ गावात बंद पाळण्यात आला होता , तर त्याविरोधात आज शहरात बंदचे आयोजन करण्यात आले होते.  कृती समितीच्या  आवाहनास  शहरातील जनतेने  प्रतिसाद देत सर्व व्यवहार बंद ठेवले. लक्ष्मीपुरी , गुजरी, शाहूपुरी व्यापार पेठ, भाऊ सिंगजी रोड, शिवाजी चौक, राजारामपुरी, बागल चौक आदी मध्यवर्ती ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली.  सर्वपक्षीय हद्दवाढ समितीचे पदाधिकारी शिवाजी चौक येथे जमले. बंदचे आवाहन करणारी रॅली शहराच्या विविध भागात फिरून पुन्हा शिवाजी चौकात आली.  हद्दवाढ रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणणाऱ्या तिन्ही आमदारांचा निषेध करताना त्या आमदारांच्या नावाने शंखध्वनी करुन त्यांच्या  धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. शहरातील सुखसोई वापरुन हद्दवाढ रोखणाऱ्या वृत्तींचा धिक्कार असो,  हद्दवाढ झालीच पाहिजे अशा घोषणांनी  परिसर दणाणून गेला. रॅलीत शिवसनिकांचा समावेश सर्वाधिक होता.

काल निषेध, आज अभिनंदन

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हद्दवाढीच्या मागणीस गती आली आहे. तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी हद्दवाढीच्या मागणीसाठी विधिमंडळाबाहेर उपोषण केले होते. या दोघांनी हद्दवाढीचे समर्थन केल्याने हद्दवाढ कृती समितीने उभयतांचे अभिनंदन केले. काल हद्दवाढीच्या विरोधकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन शिये येथे केले, आज त्यांचे अभिनंदन केले.

आंदोलक- पोलिसांत झटापटी

ताराराणी पुतळा येथे सुरु असलेल्या एका दुकानावर दगडफेक करणाऱ्या आंदोलकांस पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे संतप्त झालेले पदाधिकारी पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. आमच्यावर गुन्हे दाखल करणार तर करा, असा दम आंदोलक देत राहिले. त्यातून अधिकारी व आंदोलकांत हातघाई झाली. वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या आंदोलकास पोलिसांनी सोडून दिले.

हिंसक वळण

रॅली कॉमर्स कॉलेज येथून जात असताना या ठिकाणी उभ्या असणाऱ्या तीन रिक्षांची आंदोलकांनी तोडफोड केली. तसेच काही जण कॉमर्स कॉलेजमध्ये घुसून कॉलेज बंद करण्यास भाग पाडले. यानंतर एम. जे मार्केट येथे दोन रिक्षांची तोडफोड करण्यात आली. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एका एस. टी. वर दगडफेक करण्यात आली. यानंतर शिवाजी पुतळा येथील एक दुकान आंदोलकांनी बंद पाडले.