कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर दौरा होत असताना पूर्वसंध्येला कोल्हापुरातील भाजपचे जेष्ठ नेते, महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती आर. डी. पाटील यांनी पक्षाचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सन २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेची जिल्ह्यातील ताकद कमी होण्यासाठी त्यांचे उमेदवार पाडण्याचे आदेश तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. शिवाय त्यांच्या विरोधात उमेदवार उभे केल्याचा आरोप आज आर. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

भाजपचे माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांनी आज भाजपचा राजीनामा दिला. मागील तीस वर्ष ते भाजपमध्ये कार्यरत होते. तर सलग पंचवीस वर्ष ते नगरसेवक होते. आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचून दाखवताना पाटील उपकार परिषदेत म्हणाले, कोल्हापूर शहरांमध्ये सुरुवातीला डाव्या पक्षाचे तर नंतर काँग्रेसचे प्रभुत्व होते. अशाही परिस्थितीमध्ये मी कोल्हापुरात भाजप मर्यादित असतानाही निष्ठेने काम केले. विरोधातील वातावरण असतानाही सलग पाच वेळा भाजपकडून विजयी झालो. महापालिकेत पक्षाची भूमिका सातत्याने मांडली. माझा प्रभाव माहीत असल्याने अनेकदा तर काँग्रेसकडून तुम्ही अपक्ष म्हणून विजयी व्हा; तुम्हाला महापौर करतो, अशा पद्धतीच्या ऑफरही देण्यात आल्या होत्या. परंतु भाजपचे कार्य निष्ठेने करायचे असल्याने अशा पद्धतीच्या ऑफर मी नाकारल्या होत्या. मी काही सहकारी संस्थांमध्येही काम केले. त्या माध्यमातून भाजपकडे निधी आणण्याचेही काम केले होते.

हेही वाचा – कोल्हापूर : सत्तेत न येणाऱ्याच्याच फुकट देण्याच्या घोषणा – सुरेश हाळवणकर

भाजप बदलला

नंतरच्या काळामध्ये कोल्हापुरात भाजप वाढीस लागला. परंतु त्यामध्ये माझ्यावर अन्याय होत राहिला. माझ्या कार्यकर्त्यांचा सातत्याने अपमान होत राहिला. बदलती परिस्थिती लक्षात घेऊन पक्षाला राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

चंद्रकांतदादांना निवडणुकीत हरवणार

क्षमता असूनही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला डावलले. वेळोवेळी आपल्यावरती अन्याय केला. त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातून कुठूनही उभे राहावे, त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीने मला उमेदवारी द्यावी. त्यांना पाडून दाखवतो, असे खुलं आव्हान त्यांनी दिले आहे. यावेळी त्यांनी कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

हेही वाचा – लाच स्वीकारताना कोल्हापुरातील अन्नसुरक्षा महिला अधिकारी जाळ्यात

माझ्याकडेही बॉम्ब

विधानसभेच्या निवडणुकीवेळी चंद्रकांत पाटील सतत बॉम्ब फोडणार, बॉम्ब फोडणार म्हणत होते. त्याच पद्धतीने आपल्याकडेही पुराव्यानिशी बॉम्ब तयार आहेत. ते विधानसभा निवडणुकीच्या आधी फोडू, असा इशारासुद्धा पाटील यांनी दिला.