कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत गेलेल्या कोल्हापुरातील होमगार्डना काल पोलिसांकडून अवमानकारक वागणूक मिळाली. एका अधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. यातून संतप्त होमगार्ड या अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याचे वृत्त आहे.

मुंबई येथे लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरातून पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता . तसेच होमगार्डनाही मोठ्या संख्येने बोलावून घेण्यात आले होते. कोल्हापुरातून अनेक होमगार्ड या कामासाठी मुंबईत गेले होते. येथे नेमून गेलेले काम नीटपणे पार पाडले. आज सकाळी त्यांना मुंबईहून कोल्हापूरला सोडण्यासाठी रेल्वे जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ती वेळेत सुटली नाही. ती नंतर थोड्यावेळाने सुटणार असे सांगण्यात आले. पण त्यानंतरही सकाळी दहा-बारा, दोन वाजले असे करत संध्याकाळ झाली, तरी रेल्वे जाण्याची लक्षणे दिसेनात. यामुळे होमगार्डची अस्वस्थता वाढली होती. यातून खेरवाडी येथे हे होमगार्ड एकत्रित जमले. त्यांनी याबाबत पोलीस अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. मात्र यावेळी त्यांना योग्य उत्तर देण्याऐवजी चुकीची वागणूक देण्यात आली.

हेही वाचा – इचलकरंजीतील प्रलंबित प्रश्‍नांवरुन महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांकडून महापालिका प्रशासन धारेवर

हेही वाचा – सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; एका माजी नगरसेवकाच्या खूनाचाही होता प्लॅन?

पोलीस अधिकाऱ्यांनी होमगार्डविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली. तर एका पोलीस अधिकाऱ्यांनी तर चक्क शिवीगाळ केल्याचाही आरोप होमगार्डनी केला आहे. संतप्त झालेले अनेक होमगार्ड या अधिकाऱ्यांच्या दिशेने धावून गेले असल्याचे चित्रफितीमध्ये दिसत आहे. यातून मोठा गोंधळ उडाला.
अखेर हे प्रकरण शांत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर सायंकाळी विशेष बसने त्यांना कोल्हापूरला पाठवल्याचे वृत्त आहे. मात्र शासकीय कर्तव्यावर आलो असतानाही शासकीय अधिकाऱ्यांनीच अपमानास्पद वागणूक दिल्याने होमगार्डनी खाजगीमध्ये तीव्र संताप व्यक्त केला आहे.