कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील महादेव मंदिराशेजारील जागा आणि दुकानगाळे यावर आता ‘वक्फ’ने अधिकार सांगितला आहे. याच्या निषेधार्थ २४ मे या दिवशी गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले.

या संदर्भात समस्त हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले. या जागेच्या संदर्भात चालू असलेल्या सुनावणीच्या प्रसंगी ग्रामपंचायतीने त्यांचे म्हणणे मांडले नाही, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केला. या संदर्भात आवश्यक बाजू पडताळून वरिष्ठ स्तरावर अपील करण्याच्या, तसेच या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनास लक्ष घालण्यास सांगू असे जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळास सांगितले. या प्रसंगी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांसमवेत तेथील ग्रामस्थ पिराजी संकपाळ, अमर चौगुले, अशोक देसाई, गणेश जाधव, अनिल जाधव, प्रशांत ठमके यांसह अन्य उपस्थित होते.

आणखी वाचा-इटलीमध्ये आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली

या संदर्भात पत्रकारांशी बोलतांना वडणगे येथील ग्रामस्थ पिराजी संकपाळ म्हणाले, ‘वडणगे येथील शेतीसर्व्हे क्रमांक ८९ ही भूमी ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे. त्या संदर्भात ही भूमी आमची आहे, असा दावा ‘वक्फ’ने केला होता. या संदर्भात गेल्या २५ वर्षांपासून हा दावा चालू आहे. या दाव्यात ग्रामपंचायत प्रशासन आपली बाजू सक्षमपणे मांडत नसल्याने ही भूमी ‘वक्फ’च्या नावावर झालेली आहे. याच्या निषेधार्थगावातील तमाम हिंदूंनी बंद पाळला. ग्रामपंचायत प्रशासन योग्य भूमिका घेत नसल्यामुळेच ही परिस्थिती आज ओढावलेली आहे.’’