चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; दोन्ही पक्षांचा सन्मान राखणार

विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहेत. सत्ता स्थापन होताना युतीच्या तत्त्वांना धरून भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांचा सन्मान ठेवला जाणार आहे. काँग्रेसच्या विरोधातील राजकारण ताकदीने करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून काँग्रेसला बळ मिळणारी कृती घडणार नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

राज्यात सत्तास्थापनेबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. भाजपचाच मुख्यमंत्री होणार इथपासून ते अडीच वर्षांसाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे अनेक प्रकारचे मुद्दे पुढे यात आहेत. सत्तास्थापनेच्या घडामोडीत सहभागी असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी याबाबत बोलताना काही झाले तरी महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास या वेळी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाल्याची चर्चा चुकीची आहे, असे म्हणत त्यांनी आकडेवारीचा दाखला देत राज्यात गेल्या २० वर्षांत विधानसभा निवडणुकीत जागांची शंभरी ओलांडणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे.

भाजपला सर्वाधिक २५.७५ टक्के मते मिळाली आहेत. नेहमी मतदान यंत्रांवर ठपका ठेवणारे विधानसभेचा निकाल लागल्यापासून त्यावर बोलत नाहीत. त्यांचा मतदान यंत्रावर विश्वास बसला का, असा बोचरा सवाल पाटील यांनी विरोधकांना केला.

मंडलिकांमुळे अपयश

लोकसभेत सतेज पाटील यांनी मदत केल्यामुळे विधानसभेत हा पैरा फेडणार असे पहिल्या दिवसापासून सांगून शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी बंडखोरीचे वातावरण तयार केले. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व याच पक्षाचे चंदगडमधील त्यांचे मेहुणे राजेश पाटील यांना त्यांनी मदत केली. जिल्ह्य़ात सोईचे राजकरण करून मंडलिकांनी पक्षाला दगा दिला. मंडलिक यांच्यात मूळची काँग्रेस प्रवृत्ती असून या प्रवृत्तीच्या बंडखोरीच्या ठिणगीने युतीत बंडखोरीची आग लावली असा आरोप केला.

भाजपचे आत्मचिंतन

लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपा-शिवसेनेला राज्यभरात विविध निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाले. आमच्या सरकारने सर्वत्र चांगली कामेही केली, मात्र तरीही अनेक ठिकाणी आमचा पराभव झाला. त्यामुळे आम्ही सर्वजण चिंतेत आहोत. याचे आत्मचिंतनही आम्ही करतो आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.