राज्यातील विधानसभा निवडणुकीला आणखी चार वर्षे बाकी असली तरी त्या कधीही होतील, अशी स्थिती आहे. ही निवडणूक स्वबळावर लढू आणि राज्य आणि हिंदुत्वाच्या हितासाठी शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करू, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे केले.

राज्यातील महाविकास आघाडीविरोधात भाजप आक्रमक भूमिका घेत असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारीच अधोरेखित केले होते. मात्र पाटील यांनी मंगळवारी शिवसेनेबाबत सौम्य भूमिका घेत, युतीसाठी दरवाजे उघडे असल्याचे संकेत दिले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, बिहारमध्ये नितीशकुमार व लालूप्रसाद यादव यांनी एकत्र निवडणूक लढवली, पण तात्त्विक मतभेदामुळे नितीशकुमार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रातील स्थिती अशीच काहीशी झालेली आहे. महाविकास आघाडीतील या पक्षांशी शिवसेना आणि ठाकरे यांचे जमेलच असे नाही. ठाकरे यांचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी आजही चांगले संबंध आहेत. काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर ते थेट केंद्रीय नेतृत्वाशी बोलू शकतात. त्यामुळे भविष्यात राज्य आणि हिंदुत्वाच्या हितासाठी शिवसेनेला सोबत घेऊन आम्ही सरकार स्थापन करू शकतो. अशी सत्ता स्थापन करण्यास आम्ही तयार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

करोनाच्या चार महिन्यांच्या काळात सरकारने बरेच निर्णय घेतले आहेत. या काळात झालेल्या गैरव्यवहाराचा बुरखा भाजपकडून फाडला जाईल. सामाजिक अंतर राखून भाजप रस्त्यावर उतरेल. सध्या भाजप प्रखर विरोधकाच्या भूमिकेत आहे, असेही पाटील म्हणाले.