नेमबाज अभिनव बिंद्रा, बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणॉय यांचे निवड समितीवर टीकास्त्र

नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा याची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड करण्यात न आल्याबद्दल भारताचा एकमेव ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने शनिवारी निवड समितीवर टीकास्त्र सोडले. त्याचबरोबर अर्जुन पुरस्कारासाठी डावलल्याबद्दल बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय यानेही निवड समितीवर ताशेरे ओढले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक सुवर्ण पदके पटकावणारा माजी नेमबाज जसपाल राणा याने मनू भाकर, सौरभ चौधरी आणि अनीष भानवाला यांसारखे जागतिक दर्जाचे नेमबाज देशाला दिले. ‘‘जसपाल राणासारख्या अफाट गुणवत्ता असलेल्या प्रशिक्षकाला द्रोणाचार्य पुरस्कारासाठी डावलण्यात आले, हे निराशाजनक आहे. राणाबद्दल नितांत आदर असून त्यांचे शिष्य अधिक खडतर मेहनत घेऊन टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत निवड समितीला खोटे ठरवतील,’’ असे ट्विट नेमबाज अभिनव बिंद्राने केले आहे.

१२ जणांच्या निवड समितीने शनिवारी द्रोणाचार्य पुरस्कारासाठी विमल कुमार (बॅडमिंटन), संदीप गुप्ता (टेबल टेनिस) आणि मोहिंदर सिंग ढिल्लो (अ‍ॅथलेटिक्स) यांची निवड केली आहे. त्याचबरोबर द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कारासाठी मर्झबान पटेल (हॉकी), रामबिर सिंग खोखार (कबड्डी) आणि संजय भारद्वाज (क्रिकेट) यांची निवड केली आहे. पाच लाख रुपये असे द्रोणाचार्य पुरस्काराचे स्वरूप आहे.

दरम्यान, बिंद्राने दिलेल्या पाठिंब्याबद्दल जसपाल राणाने त्याचे आभार मानले आहेत. ‘‘बिंद्राचे हे शब्द माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. मात्र कुणासमोरही स्वत:ला सिद्ध करण्याची गरज वाटत नाही,’’ असे ट्विट जसपाल राणा याने केले आहे.

अर्जुन पुरस्कारासाठीचे निकष काय आहेत?

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय याने शनिवारी अर्जुन पुरस्कारासाठी निवडीचे निकष काय आहेत, असा सवाल विचारला आहे. मैदानावरील कामगिरीपेक्षा पुरस्कारासाठी कोण शिफारस करते, हे सर्वात महत्त्वाचे आहे, अशी टीका त्याने केली. निवड समितीने बी. साईप्रणीथची अर्जुन पुरस्कारासाठी निवड केली आहे. भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने दुहेरीतील मनू अत्री याची शिफारस करूनही त्याला पुरस्कारासाठी डावलण्यात आले आहे. मात्र गेल्या वर्षी चांगली कामगिरी केली नसल्यामुळे प्रणॉयची अर्जुन पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस करण्यात आली नसल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

‘‘पुरस्कारांच्या यादीत तुम्हाला तुमचे नाव हवे असेल तर यादीत नाव टाकणारी माणसे तुमच्याकडे हवीत. आपल्या देशात किमान कामगिरी ग्राह्य़ धरायला हवी. पण तसे होत नसल्याचे दुर्दैव आहे. जोपर्यंत पुरस्कार मिळत नाही, तोपर्यंत खेळावे लागणार आहे,’’ अशी संतप्त प्रतिक्रिया प्रणॉयने व्यक्त केली.

‘‘असोसिएशनने साईप्रणीथ आणि मनू अत्री यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली होती. प्रणॉयने आपला अर्ज पाठवला होता, पण गेल्या वर्षांतील कामगिरीनुसार त्याच्या अर्जाचा विचार करण्यात आला नाही,’’ असे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.