स्ट्रांजा बॉक्सिंग स्पर्धा

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना पदक मिळवूनच श्रद्धांजली वाहण्यासाठी मी अस्वस्थ होतो. मी स्वत: सैनिकी परिवाराचा सदस्य असल्याने माझ्या मनात त्या घटनेची वेदना अधिकच तीव्र होती, अशा शब्दांत भावना व्यक्त करीत भारतीय बॉक्सिंगपटू अमित पांघलने स्ट्रांजा बॉक्सिंग स्पर्धेतील सुवर्णपदक शहीद जवानांना समर्पित केले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या अमितने युरोपमधील सलग दुसऱ्या मोठय़ा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. सैन्यदलात नायब सुभेदार पदावर कार्यरत असलेल्या २३ वर्षीय अमितने स्पर्धेत उतरतानाच पदक मिळवून ४० शहीद सैनिकांना पदक समर्पित करण्याचा निर्धार केला होता.

‘‘मी सैनिकच असल्याने माझ्यासाठी ते दु:ख अधिकच तीव्र होते. मी बल्गेरियातील सोफियाला उतरता क्षणी मला त्या घटनेची माहिती झाली होती. माझ्या कुटुंबीयांशी बोलताना मला त्या वेदनेचा गहिरेपणा अधिकच जाणवला. माझ्या कुटुंबीयांनीदेखील माझ्या शहीद सैनिकांसाठी मी पदक मिळवायलाच हवे, असे मला बजावले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पदक मिळवायचेच असा मी निर्धार केला होता,’’ असे अमितने सांगितले.

‘‘माझे वजन निकषापेक्षा अधिक असल्याने ते ४९ किलो करण्यासाठी प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वी मी निकराने प्रयास करीत होतो. अखेरीस काही रात्री उपाशी झोपून मी त्या वजन गटात समाविष्ट होऊ शकलो.

या वजन गटातील माझी ही अखेरची स्पर्धा असून ऑलिम्पिकमध्ये ५२ किलो वजनी गट असल्याने मला आता यापुढे त्याच वजनी गटात खेळायचे आहे. या स्पर्धेत रशिया, कझाकिस्तान आणि युक्रेन यांनी त्यांचे अव्वल बॉक्सिंगपटू उतरवले होते. त्यामुळे या स्पर्धेतील सुवर्णपदक हे माझ्यासाठी अधिक मोलाचे आहे,’’ असे अमितने नमूद केले.