सध्या ऑस्ट्रेलियातील क्रिकेट आणि त्यांचे खेळाडू चर्चेचा विषय ठरत आहेत. कॅमेरून बॅनक्रॉफ्टने बॉल टेम्परिंग घटनेबाबत एक खुलासा केला. त्यामुळे २०१८मध्ये घडलेल्या या घटनेला एक वेगळेच वळण लागले आहे. नवीन माहितीच्या आधारे या प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जाईल असा दावा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केला आहे. या प्रकरणानंतर आता अजून एक गंभीर प्रकरण समोर आले आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आरोन समर्सला सोमवारी डार्विन कोर्टात हजर करण्यात आले. गेल्या आठवड्यात त्याला अटक करण्यात आली होती. लहान मुलांचे शोषण केल्याचा आरोप समर्सवर ठेवण्यात आला आहे. समर्स हा वेगवान गोलंदाज असून तस्मानियासाठी तीन सामने खेळला आहे. बिग बॅश लीगमध्ये त्याने होबार्ट हरिकेन्सचेही प्रतिनिधित्व केले. २५ वर्षीय समर्सने पोलिसांसमवेत स्थानिक न्यायालयात हजेरी लावली. समर्सच्या मोबाइल फोनमध्ये लहान मुलांचे शोषण केल्याचे व्हिडिओ आहेत.

 

नॉर्दर्न टेरिटरीज पोलिस सेवेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, समर्स असे बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी अनेक मुलांशी संपर्क साधत होता. पत्रकात म्हटले आहे, की पोलिसांचा असा आरोप आहे, की समर्सच्या मोबाइलमध्ये अत्याचाराचे अनेक व्हिडिओ आहेत. आणखी असे अश्लील फोटो घेण्यासाठी समर्स १० मुलांशी संपर्कात असल्याचा पुरावाही होता.

पोलीस अधिकाऱ्यांनी क्रिकेटपटूच्या या कृत्याचा तीव्र निषेध करत त्याच्या वागण्याला ‘घृणास्पद’ असे वर्णन केले. समर्स यावर्षी अबुधाबी येथे टी-१० लीगमध्ये खेळला होता. जिथे त्याने डेक्कन ग्लॅडिएटर्सचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र इतक्या गंभीर आरोपानंतर समर्सची क्रिकेट कारकीर्द संकटात सापडली आहे.कोर्टाकडून लवकरच याप्रकरणी आपला निर्णय जाहीर होणे अपेक्षित आहे.