आयपीएलच्या तेराव्या हंगामाला युएईत सुरुवात झाली आहे. शनिवारी अबु धाबीत गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगला. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाच्या हंगामाचं आयोजन युएईत केलं. बीसीसीआय आणि युएई या दोन क्रिकेट बोर्डांनी आयपीएलच्या पहिल्या सामन्यानिमीत्त दोन्ही देशांमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी करार केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबद्दल आपल्या ट्विटर हँडलवर माहिती दिली.

हा करार करताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि खजिनदार अरुण धुमाळ हे देखील हजर होते. दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये झालेल्या करारावरुन आयपीएलचा आगामी हंगाम आणि २०२१ मध्ये इंग्लंड संघाचा भारत दौराही युएईत आयोजित केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. येत्या काही महिन्यांमध्ये भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारली नाही तर बीसीसीआय पुढील आयपीएल हंगामाच्या आयोजनासाठी युएईत करु शकतं.

“येत्या काळात दोन महत्वाच्या स्पर्धा आहेत. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येतोय…ज्याचं आयोजन भारतातच करण्याचं पहिलं प्राधान्य असणार आहे. परंतु तोपर्यंत करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आली नाही…तर दुसरा पर्याय म्हणून युएई क्रिकेट बोर्डासोबत करार करण्यात आला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता हा पर्याय तयार करण्यात आला आहे. यानंतर पुढच्या वर्षीचं आयपीएल ही मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत आयोजित करायचं आहे.” बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआयला माहिती दिली.