श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी मालिकेत भारताचा इशांत शर्मा त्याच्या गोलंदाजीपेक्षा यजमानांबरोबरच्या वादांमुळे जास्त चर्चेत राहिला. इशांतची आक्रमकता कीव आणणाऱ्या वागणुकीचे दर्शन घडवत होती, असे मत भारताचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांनी व्यक्त केले. तसेच कर्णधार विराट कोहलीनेही स्वत:च्या भांडखोर वृत्तीवर नियंत्रण ठेवून भारतीय खेळाडूंसमोर आदर्श ठेवायला हवा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
कोलंबो कसोटीत इशांतने भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने या कसोटीत आठ बळी घेतले आणि कारकीर्दीतील २०० बळींचा टप्पा गाठला. परंतु त्याच्या मैदानावरील वागणुकीमुळे ही कामगिरी झाकोळली गेली. दुसऱ्या कसोटीत अशाच वर्तनामुळे त्याच्या मानधनातील ६५ टक्के रक्कम दंड म्हणून कापली आणि त्याला ताकीद देण्यात आली होती. तिसऱ्या कसोटीतही इशांतचा पारा चढाच राहिल्याने आयसीसीच्या नियमानुसार त्याच्यावर एक कसोटीच्या बंदीची शिक्षा ठोठावण्यात आली. बेदींनी या मालिकेतील ही दुर्दैवी घटना असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, ‘‘भारताने  आक्रमक खेळ करावा, असे म्हटले जात होते. इशांतला त्याची शिक्षा भोगावी लागली. क्रिकेट मैदानात अशा प्रकारची वागणूक तुम्हाला हवी आहे? आक्रमकतेचा कीव आणणारा हा प्रकार आहे.’’