ऑस्ट्रेलियाने वन डे मालिकेत इंग्लंडला २-१ने पराभूत करत विजय मिळवला. जॉनी बेअरस्टोचे शतक आणि बिलिंग्स, वोक्सची अर्धशतके यांच्या बळावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियापुढे ३०३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल आणि कॅरी यांनी दमदार शतकं ठोकत संघाला विजय मिळवून दिला. धडाकेबाज खेळ करणाऱ्या मॅक्सवेलला सामनावीर व मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा खूपच रोमांचक झाला. पण त्याचसोबत हा दौरा एका वेगळ्याच कारणासाठी गाजला. ते कारण म्हणजे DRS. टी२० मालिकेत फिंचच्या बॅटवर चेंडू आदळल्याचं स्पष्ट दिसूनही जो रूटने DRSची मागणी केली होती. त्या विचित्र प्रकाराची पुनरावृत्ती शेवटच्या वन डे सामन्यात दिसून आली. सामन्याच्या १९व्या षटकात इंग्लंडचा बेअरस्टो फलंदाजी करत होता. तेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडू त्याने हळूच टोलवला. चेंडू बॅटला लागत असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही फिंचने DRSची मागणी केली आणि तो निर्णय अर्थातच त्यांच्या विरोधात गेला. या घटनेनंतर फिंचच्या या निर्णयानंतर ट्विटरवर चांगलीच टीका करण्यात आली.

दरम्यान, इंग्लंडने तिसऱ्या वन डे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दोन चेंडूत जेसन रॉय आणि कर्णधार जो रूट यांचे बळी गमावले. जॉनी बेअरस्टोने एकहाती खिंड लढवली. त्याने १२६ चेंडूत ११२ धावा केल्या. तर सॅम बिलिंग्स (५७) आणि ख्रिस वोक्स (नाबाद ५३) यांनी दमदार फलंदाजी करत संघाला त्रिशतकी मजल मारून दिली. ३०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद ७३ अशी झाली होती. पण त्यानंतर अलेक्स कॅरी (१०६) आणि ग्लेन मॅक्सवेल (१०८) या दोघांनी तब्बल २१२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.