शरीरसौष्ठवपटू श्वेता राठोरचा निर्धार * सातवी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा आजपासून
‘‘आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावल्यावर माझा आत्मविश्वास उंचावला आहे. त्याचा फायदा मला विश्व शरीरसौष्ठव स्पर्धेत नक्कीच होणार असून आता सुवर्णकळस गाठायचा माझा निर्धार आहे,’’ असे भारताचे महिला फिजिक आणि फिटनेस स्पर्धेत प्रतिनिधित्व करणाऱ्या श्वेता राठोरने सांगितले. भारतामध्ये महिला शरीरसौष्ठवाबद्दल जागृती नसली तरी अन्य देशांमध्ये चांगलीच स्पर्धा पाहायला मिळते. हंगेरी, ब्राझील, नेदरलँड्स, थायलंडसारख्या देशाच्या महिला शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या वेळी सर्वात तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. कारण ४५ देशांमधले पाचशेपेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर १६० आणि १६५ सेंमी उंचीच्या या दोन्ही गटांना एकत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे या वेळी महिलांच्या स्पर्धेत चांगली चुरस पाहायला मिळणार असल्याचे श्वेताने सांगितले.
या स्पर्धेबाबत श्वेता म्हणाली की, ‘‘थायलंडने गेल्या वर्षी सांघिक जेतेपद पटकावले होते. या वेळी तर त्यांच्या देशातच स्पर्धा होत असल्याने त्यांना जास्त संधी आहे. कारण येथील वातावरण आणि आहार याबाबत त्यांना चांगलीच माहिती आहे. पण या वातावरणात जास्त पाणी न पिता स्पर्धेत उतरणे आमच्यासाठी सोपे नाही. पण स्पर्धा म्हटली की या सर्व गोष्टी ओघाने आल्याच. त्यामुळे कोणतीही सबब मी देणार नाही.’’ या स्पर्धेत भारताच्या महिलांनी आतापर्यंत सुवर्णपदक पटकावलेले नाही. याबाबत श्वेताला विचारले असता ती म्हणाली की, ‘‘स्पर्धेत उतरताना कधीही इतिहासाचा विचार करायचा नसतो, तर इतिहास घडवायचा असतो. प्रत्येक संधीचे सोने तुम्हाला करता यायला हवे. त्यामुळे यापूर्वीच्या कामगिरीचा विचार माझ्या मनात नक्कीच नाही. या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकण्याचे माझे लक्ष्य आहे. त्यामुळे या वेळी इतिहास रचण्यासाठी मी पूर्णपणे सज्ज आहे. माझ्या कामगिरीने भारताचा तिरंगा फडकवायचा असून देशवासीयांच्या अपेक्षांची पूर्ती करायची आहे.’’
कडवी स्पर्धा पाहायला मिळेल -बैजू
बँकॉक : या स्पर्धेत सर्व देश जोरदार तयारीने उतरले आहेत. त्यामुळे या वेळी कडवी स्पर्धा पाहायला मिळेल, पण भारताच्या ४६ शरीरसौष्ठवपटूंनी चांगलीच कंबर कसली आहे, त्यांच्याकडून आम्ही चांगली मेहनत करून घेतली असून ही स्पर्धा चांगलीच रंगतदार होईल, असे मत भारताचे प्रशिक्षक बैजू यांनी या वेळी सांगितले. ‘‘थायलंड, इराण, हंगेरी या देशांकडून या वेळी चांगली चुरस पाहायला मिळेल. हंगेरी आणि इराणच्या शरीरसौष्ठवपटूंनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. थायलंडने गेल्या वेळी सांघिक जेतेपद पटकावले होते, पण भारताचे शरीरसौष्ठवपटूंनी देखील चांगली तयारी केली आहे,’’ असे बैजू म्हणाले. भारताच्या शरीरसौष्ठपटूंबाबत बैजू म्हणाले की, ‘‘आम्ही या वेळी सांघिक जेतेपद पटकावण्याचा निर्धार केला आहे. पुरुषांमध्ये बिपीन पीटर, बॉबी सिंग, रॉबी मेतैयी यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा आहेत. महिलांमध्ये ममता देवी यमनम, सरिता देवी, रबिता देवी, सोनाली स्वामी यांच्याकडून आम्हाला मोठय़ा आशा आहेत.’’

निर्जलीकरणामुळे शरीरसौष्ठवपटू बेजार

स्पर्धेची सुरुवात ही नेहमीच वजन तपासणीने होत असते. त्यामुळे आपल्या गटामध्ये वजन बसवण्यासाठी शरीरसौष्ठवपटू दिवसाला फक्त १०० मिली एवढेच पाणी पितात. पण त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतो. थायलंडच्या उष्ण वातावरणाचा चांगलाच फटका आशियाबाहेरील देशांच्या शरीरसौष्ठवपटूंना बसल्याचे पाहायला मिळाले. ३-४ शरीरसौष्ठवपटूंचा वजन तपासणीपूर्वीच घोळ झाल्याचे पाहायला मिळाले असून निर्जलीकरणाचा फटका त्यांना बसल्याचे पाहायला मिळाले. पण यामध्ये भारताचा एकाही शरीरसौष्ठवपटूचा सहभाग नव्हता.

सांघिक जेतेपदाचा भारताचा निर्धार
तब्बल ४५ देश, जवळपास पाचशे स्पर्धक आणि तमाम थायलंडवासीयांच्या साक्षीने या स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत सांघिक जेतेपद पटकावण्याचा निर्धार केला असला तरी त्यांच्यापुढे यजमान थायलंड, इराण, हंगेरी या देशांचे प्रामुख्याने आव्हान असेल. गुरुवारी पुरुषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत ५५, ६० आणि ६५ किलो वजनी गटांचा कस लागणार आहे. याामध्ये भारताच्या नितीन म्हात्रे, आकाश दास, इक्रम खान, रॉबी मैतेयी, अर्नाल्ड फुगडे आणि कृष्णा पोतिना या शरीरसौष्ठवपटूंचा समावेश आहे. भारताला पहिल्या दिवशी रॉबीकडून सुवर्णपदाची आशा आहे. या दिवशी पुरुषांची स्पोर्ट्स फिजिक (१७५ सेंमी. उंची) ही स्पर्धाही होणार रंगणार आहे. या स्पर्धेत भारताकडून राजेश सावंत, गौरव कुमार, निशांत चौधरी, अनुप सिंग ही चौकडी उतरणार आहे. महिलांची फिटनेस आणि फिजिक (१६५ सेंमी. उंची) ही स्पर्धा पहिल्या दिवशी रंगणार असून यामध्ये भारताच्या श्रेयसी दास, श्वेता राठोर, कपिला गोगिया, सोनिया मित्रा या खेळाडूंचा सहभाग आहे.

पहिल्या दिवशी स्पर्धेत सहभागी होणारे भारताचे स्पर्धक
पुरुष शरीरसौष्ठव
५५ किला : नितीन म्हात्रे, ६० किलो : आकाश दास, इक्रम खान,
रॉबी मैतेयी आणि ६५ किलो : अर्नाल्ड फुगडे, कृष्णा पोतिना.
पुरुष स्पोर्ट्स फिजिक
राजेश सावंत, गौरव कुमार, निशांत चौधरी आणि अनुप सिंग.
महिला फिटनेस आणि फिजिक
श्रेयसी दास, श्वेता राठोर, कपिला गोगिया, सोनिया मित्रा.