ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या जर्मनीच्या खेळाडूंना येथे हॉलिवूड कलाकारांप्रमाणे सन्मान मिळाला. निमित्त होते त्यांच्यावरच काढण्यात आलेल्या चित्रपटाच्या प्रीमिअरचे.
या खेळाडूंच्या कामगिरीवर ‘दी टीम’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये जर्मनीच्या विजेतेपदाचे रहस्य उलगडण्यात आले आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर शो येथील पोट्सडॅमर प्लाट्झ सिनेमागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यास संघातील खेळाडूंबरोबरच प्रशिक्षक, सहायक स्टाफ, तसेच माजी खेळाडू व प्रशिक्षक उपस्थित होते.
जर्मनीचे प्रशिक्षक जॉकीम लोव यांनी सांगितले, संघ म्हणून प्रत्येकाने खेळले तरच विजेतेपद मिळविता येते हे आम्ही दाखवून दिले आहे आणि या चित्रपटात हाच मुद्दा प्रामुख्याने केंद्रीय स्थानी आहे.
खेळाडू व प्रशिक्षकांचे येथे आगमन झाले, त्या वेळी चित्रपटगृहाच्या दारापासून लोकांनी दुतर्फा उभे राहून त्यांचे स्वागत केले. अंतिम लढतीमधील अतिरिक्त वेळेत विजयी गोल करणाऱ्या मारिओ गोएट्झ याचे चाहत्यांनी प्रचंड जल्लोषात स्वागत केले.
चित्रपट सुरू होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी ही स्पर्धा अतिशय दिमाखात आयोजित करणाऱ्या ब्राझीलच्या संयोजकांचे मनोमन आभार मानले.