गेल्या दशकभरात बॅडमिंटन हा क्रीडाप्रकार भारतातील तरुण पिढीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. यामध्ये सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू या महिला खेळाडूंचे अमूल्य योगदान आहे. गेल्या दोन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारताने बॅडमिंटनमध्ये प्रत्येकी एक रौप्य आणि कांस्यपदक जिंकले आहे. यंदाही बॅडमिंटनकडून भारताच्या नावावर किमान एका पदकाची नोंद नक्कीच होईल, अशी आशा आहे.

भारतीय बॅडमिंटनला जगभरात नावलौकिक मिळवून देणारे पहिले शिलेदार म्हणजे प्रकाश पदुकोण. प्रकाश यांनी १९७१-८०च्या दशकात वर्चस्व गाजवले. राष्ट्रीय स्पर्धाचे जेतेपद मिळवण्याबरोबरच त्यांनी सर्वात प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड आणि राष्ट्रकुल यांसारख्या स्पर्धेतही अजिंक्यपद मिळवले. मात्र १९९२च्या ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनचा प्रथमच स्पर्धात्मक क्रीडाप्रकार म्हणून समावेश करण्यात आल्यामुळे त्यापूर्वीच निवृत्ती पत्करणाऱ्या प्रकाश यांना या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभली नाही. विमल कुमार, दीपनकार भट्टाचार्य आणि मधुमिता बिश्त यांनी भारताकडून सर्वप्रथम ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला. त्यानंतर पुलेला गोपिचंद यांनी भारतीय बॅडमिंटनची सूत्रे हाती घेतली. सध्याच्या भारतीय बॅडमिंटनपटूंना यशाची शिखरे गाठून देण्यात गोपिचंद यांनी मोलाची भूमिका बजावली. महिलांमध्ये अपर्णा पोपट, ज्वाला गट्टा यांनीही उत्तम कामगिरी केली. परंतु २०१२चे लंडन ऑलिम्पिक भारतीय बॅडमिंटनचे रूप पालटणारे ठरले. गोपिचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सायना नेहवालने बॅडमिंटनमधील पहिलेवहिले कांस्यपदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले. त्यानंतर चार वर्षांनी २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूने आणखी एक पाऊल पुढे टाकून ऐतिहासिक रौप्यपदकावर मोहोर उमटवली.

अपेक्षा : एकूण चार खेळाडू यंदा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांपैकी २०१६च्या रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूकडूनच चाहत्यांना सर्वाधिक अपेक्षा आहेत. पुरुष एकेरीत बी. साईप्रणितला कडवा संघर्ष करावा लागेल. पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी-सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी यांच्यात धक्कादायक कामगिरीसह कांस्यपदक जिंकण्याची क्षमता आहे.

भारतीय क्रीडापटू

  • महिला एकेरी : पी. व्ही. सिंधू
  • पुरुष एकेरी : बी. साईप्रणित
  • पुरुष दुहेरी : चिराग शेट्टी आणि

सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी

.. तर दोन्ही हॉकी संघांना सुवर्णपदके

संघांमधील खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर अंतिम फेरीची लढत होऊ न शकल्यास, दोन्ही संघांना सुवर्णपदक बहाल करण्यात येईल, असे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) स्पष्ट केले. करोनामुळे ‘एफआयएच’ने ऑलिम्पिकसाठी विशेष नियमावली तयार केली आहे. एखादा संघ साखळी गटातील सामना खेळू शकला नाही तर प्रतिस्पर्धी संघाला ५-० असे विजयी घोषित केले जाईल. दोन्ही संघांना खेळता आले नाही, तर सामना गोलशून्य बरोबरीत सुटला, असे मानले जाईल.

वेटलिफ्टर मीराबाई चानू टोक्योत दाखल

सध्या अमेरिकेत सराव करत असलेली भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू ऑलिम्पिकसाठी शुक्रवारी टोक्योत दाखल झाली. मीराबाई ४९ किलो वजनी गटात सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

बाख यांच्या हिरोशिमा भेटीवरून संमिश्र प्रतिक्रिया

हिरोशिमा : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी शुक्रवारी हिरोशिमा शहराला भेट दिल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. तसेच ‘आयओसी’चे उपाध्यक्ष जॉन कोट्स यांनी अमेरिकेने अणुहल्ला केलेल्या नागासाकी शहराला भेट दिली. या भेटीदरम्यान बाख यांच्यासोबत संयोजन समितीच्या अध्यक्षा सेइको हशिमोटो यासुद्धा होत्या.