आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणावरील माझ्या प्रतिक्रियेचा संदर्भ लक्षात न घेता त्यावर भाष्य करण्यात आल्याने मी निराश झालो आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केले आहे.
सोमवारी, आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि भ्रष्टाचार प्रकरण खेदजनक असून, खेळाची विश्वासार्हता टिकवण्याला सर्वोच्च प्राधान्य असायला हवे. आम्ही क्रिकेटपटू म्हणून जे काही आहोत ते चाहत्यांमुळेच. खेळाडू आणि चाहते असल्यामुळेच क्रिकेट प्रशासक काम करू शकतात. सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना कामकाजाइतकेच विश्वासार्हता कळीचा मुद्दा आहे, असे मत द्रविडने व्यक्त केले होते.
एका खासगी संकेतस्थळाने द्रविडची मुलाखत घेतली असून त्यामधील काही अंश त्यांनी ‘ट्विटर’च्या माध्यमातून प्रसिद्ध केला. यामध्ये ‘‘काही प्रसारमाध्यमांनी संदर्भ लक्षात न घेता माझ्या प्रतिक्रियेवर भाष्य केले आहे.’’  असे द्रविडने म्हटले आहे. द्रविडची संपूर्ण मुलाखत बुधवारी प्रसिद्ध करणार असल्याची माहिती या संकेतस्थळाने दिली आहे. ‘‘राहुल द्रविडने व्यक्त केलेल्या क्रिकेटच्या विश्वासार्हतेच्या प्रतिक्रियेवर बरेच निष्कर्ष काढण्यात आले असून बरेच वादविवादही झाले आहेत,’’ असे या संकेतस्थळाने ‘ट्विटर’वर म्हटले आहे.