भारताला बांगलादेशविरुद्ध पराभव पत्करण कधीच आवडत नाही. तर दुसरीकडे अगदी हिच स्थिती बांगलादेशचीही आहे. बांगलादेशलाही भारताविरुद्धचा पराभव सहजासहजी पचवता येत नाही. कोणीही या गोष्टी ऑन रेकॉर्ड सांगत नसले तरी या गोष्टी खऱ्या आहेत.

भारत आणि बांगलादेश हे दोन्ही देश आशिया खंडातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेतच. क्रिकेटदेखील त्यातलाच एक भाग आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असला की त्याची सर्वच ठिकाणी चर्चा होत असते. परंतु आतापर्यंत हे सामने एकतर्फीच झाल्याचं पहायला मिळालं आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील अतितटीचा अखेरचा सामना 2014 च्या आशिया चषकादरम्यान झाला होता. यामध्ये शाहिद आफ्रिदीने अखेरच्या षटकात दोन षटकार ठोकत पाकिस्तानला एक गडी राखून विजय मिळवून दिला होता. त्यानंतर झालेल्या 9 पैकी 8 सामन्यांमध्ये भारताने सहज विजय मिळवला होता.

बांगलादेशमध्ये 2015 मध्ये खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यांनंतर बांगलादेशला भारताचा पराभव करता आला नाही. परंतु त्यानंतर झालेल्या अनेक सामन्यांमध्ये बांगलादेशने भारताला ‘काँटे की टक्कर’ दिली होती. खेळाडूंच्या हाताबाहेर असलेल्या काही समीकरणांमुळे बांगलादेशला अनेकदा भारतापुढे शरणागती पत्करावी लागली. 1990 च्या अखेरीस आणि 2000 च्या सुरूवातीला परिस्थिती ठिक होती, कारण त्यावेळी भारताने बांगलादेशला टेस्ट मॅचेसचा दर्जा देण्यासाठी मदत केली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2000 मध्ये बांगलादेशने भारताविरुद्ध ढाकामध्ये पहिली टेस्ट मॅच खेळली होती. त्यानंतर मात्र परिस्थिती बदलत गेली. अनेकदा बांगलादेश दौऱ्यादरम्यान भारताकडून मुख्य संघाऐवजी दुसरा संघ पाठवण्यात आला होता. तसेच भारतामुळे बांगलादेशला त्यानंतर बांगलादेशला पुढची टेस्ट मॅच खेळण्यासाठी 17 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली होती. 2007 मध्ये बांगलादेशने भारताला नमवून मोठा धक्का दिला होता. त्यानंतर काही वर्षांनी विरेंद्र सेहवागने बांगलादेशच्या संघाला साधारण संघ असल्याचे सांगत ते सहजरित्या भारताचा पराभव करू शकणार नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर शकिब अल हसनेनेही त्यावर प्रतिक्रिया देत भारत हा क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असला तरी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा संघ भारतापेक्षा श्रेष्ठ असल्याचे म्हटले होते.

तसेच नंतरच्या काळात सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे दोन्ही संघांमधील संबंध ताणले गेले. तसेच भारताच्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान, काही बांगलादेशच्या काही समर्थकांनी भारतीय संघाचा चाहता सुधीर गौतमवरही हल्ला केला होता. तसेच सोशल मीडियावरून बांगलादेशच्या समर्थकांचा आणखी एक चेहरा समोर आला होता. आशिया चषकादरम्यान बांगलादेशच्या काही समर्थकांनी महेंद्रसिंग धोनीचे शिर हातात घेतलेल्या तस्कीन अहमदचा एक फोटो फोटोशॉप करून व्हायरल केला होता. त्यानंतर टी 20 विश्वचषकादरम्यान मुश्फिकूर रहीमने भारताविरोधात एक पोस्ट टाकली होती. त्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्या काही अतितटीचे सामनेही झाले. मार्च 2018 मध्ये झालेल्या निदाहास चषकात बांगलादेशने उत्तम कामगिरी केली होती. परंतु दिनेश कार्तिकच्या उत्तम खेळीने त्यांचा हातातील विजय निसटला होता. त्यानंतर आशिया चषकातही या दोन्ही संघांमध्ये झालेला सामना अखेरच्या चेंडूपर्यंत गेला होता. त्यावेळीही निकाल भारताच्याच बाजूने लागला होता. निदाहास चषकादरम्यान बांगलादेशच्या समर्थकांची वागणुकीमुळे श्रीलंकेच्या समर्थकांनीही अंतिम सामन्यात भारतीय संघाला समर्थन दिले होते.

दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार मुर्तजाने संघाच्या समर्थकांच्या असलेल्या तणावाबद्दल भाष्य केले होते. खेळामध्ये सर्वकाही आपल्या कौशल्यावर अवलंबून असते. क्रिकेट हा एक मानसशास्त्रावर आधारित खेळ आहे. समर्थक आपल्या प्रमाणे व्यक्त होत असतात. त्यांचं वागण संघावर काही परिणाम करतं असं वाटत नाही. सर्व प्रकारच्या तणावांना खेळाडूंकडून निंयंत्रित केले पाहिजे, असेही तो म्हणाला होता. तसेच हे यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे प्रत्येकावर अवलंबून असते. बांगलादेशच्या संघाला समर्थकांचा पाठिंबा मिळतोय ही चांगली बाब आहे. आमचा संघ जिंकावा अशी त्यांची इच्छा आहे आणि स्वाभाविक बाब आहे. भारतीय संघालाही ही गोष्ट लागू होते, असेही त्याने सांगितले होते. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर आजच्या सामन्यामध्ये निकाल कोणाच्या बाजून लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.