इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर तिसऱ्या महत्वाच्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक घटना घडली आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या तिसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे. या सामन्यात तो भारताची लाज राखू शकेल अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे.

आयर्लंडविरुद्ध झालेल्या आपल्या पहिल्याच टी-२० सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाल्याने बुमराहच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे त्याला काही काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते. मात्र, आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी त्याची निवडही झाली होती. मात्र, पहिल्या दोन कसोटी सामन्यांदरम्यान तो फिटनेस चाचणी पूर्ण करु शकला नव्हता, त्यामुळे त्याचा संघात समावेश झाला नव्हता.

बुमराहच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करीत इंग्लंडचे २० बळी घेतले होते. मात्र, दुसऱ्या कसोटीत त्यांनी सपशेल नांगी टाकली होती. तसेच भारताचे फलंदाजही अपयशी ठरले होते. या सामन्यांत भारतीय गोलंदाज इंग्लंडचे केवळ सातच बळी घेऊ शकले होते. दरम्यान, इंग्लंडने भारताचा एक डाव आणि १५९ धावांनी दणदणीत पराभव केला होता. तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत इंग्लंड सध्या २-० अशा आघाडीवर आहे. त्यामुळे ही मालिका भारताच्या हातून गेली असली तरी तिसरा शेवटचा सामना जिंकून लाज राखण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

दरम्यान, बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून आपल्या वेगवान माऱ्याने तो इंग्लंडच्या खेळाडूंवर तुटून पडण्यासाठी सज्ज झाल्याचे क्रिडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांनी आपल्या ट्विटद्वारे सांगितले आहे. वेगवान गोलंदाज बुमराहने या वर्षीच्या सुरुवातीला दक्षिण अफ्रिका दौऱ्यातून आपल्या कसोटी कारकीर्दीला सुरुवात केली. या दौऱ्यादरम्यान त्याने दखलपात्र कामगिरी केली होती. या कसोटी मालिकेत तो दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू ठरला होता. तीन सामन्यांत मिळून १४ धावांसह ५ बळी त्याने घेतले होते.