भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यामध्ये काल(दि.२६) झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीदने भारताचा कर्णधार विराट कोहलीला ६६ धावांवर तंबुचा रस्ता दाखवला. या विकेटसोबतच विराटच्या शतकाची वाट बघणारे असंख्य चाहते निराश झाले. विशेष म्हणजे रशिदने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवव्यांदा कोहलीची विकेट घेतली. यासोबतच रशिद कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (सर्व प्रकार) सर्वाधिक वेळेस बाद करणारा फिरकी गोलंदाज ठरला. पण कोहलीला सर्वाधिक वेळेस बाद करणाऱ्या वेगवान गोलंदाजापेक्षा तो अजून मागे आहे.

विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस बाद करणाऱ्या फिरकीपटूंमध्ये आदिल रशिदनंतर मोईन अली (8 वेळेस), ग्रॅम स्वान (8 वेळेस), एडम झॅम्पा (7 वेळेस) आणि नॅथन लायन (7 वेळेस) यांची नावं आघाडीवर आहेत.

तर,  कोहलीला सर्वाधिक वेळेस बाद करणाऱ्यांच्या  यादीमध्ये सर्वात वरती न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साउथीचा क्रमांक आहे. साउथीने कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १० वेळेस बाद केलंय. त्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा नंबर लागतो. अँडरसनने आतापर्यंत कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ वेळेस बाद केलंय. अँडरसनसोबत फिरकीपटू ग्रॅम स्वान यानेही कोहलीला आठ वेळेस बाद केलं आहे.

दरम्यान, एकदिवसीय मालिकेआधी झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतही राशिदच्या लेग स्पिनमुळे विराट अडचणीत आला होता. त्या मालिकेत राशिदने दोन वेळेस कोहलीची विकेट घेतली होती, त्यानंतर कालच्या सामन्यात पुन्हा एकदा त्याने कोहलीची शिकार केली. विशेष म्हणजे याच सामन्यात २२ व्या षटकात कोहलीला राशिदच्याच गोलंदाजीवर जीवदान मिळालं होतं, ३५ धावांवर खेळताना बटलरने त्याचा झेल सोडला. पण त्यानंतर अर्धशतक पूर्ण करुन ६६ धावांवर खेळत असताना राशिदने पुन्हा एकदा कोहलीला चकवलं आणि त्याला बटलरकडेच झेल द्यायला भाग पाडलं.