Virat Kohli Scores 600 Runs In IPL 2024 : आयपीएल २०२४ मधील ५८ व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने होते. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबीसाठी विराट कोहलीने तुफानी खेळी केली. धरमशालामध्ये पाऊस आणि गारपिटीनंतर विराट कोहलीने गोलंदाजांविरुद्ध धावांचा पाऊस पाडला. त्याचे शतक ८ धावांनी हुकले. त्याने ४७ चेंडूत १९५.७४ च्या स्ट्राईक रेटने ९२ धावा केल्या. या खेळीत किंग कोहलीने ७ चौकार आणि ८ षटकार मारले. या खेळीदरम्यान विराटने इतिहास रचला.
विराटच्या पंजाबविरुद्ध १००० धावा पूर्ण –
विराट कोहलीने पंजाब किंग्जविरुद्ध १००० धावा पूर्ण केल्या आहेत. तो सर्वाधिक विरोधी संघांविरुद्ध १००० हून अधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. पंजाब किंग्ज व्यतिरिक्त, विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १००० हून अधिक धावा केल्या आहेत. त्यांच्याशिवाय, रोहित शर्मा (दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स) आणि डेव्हिड वॉर्नर (कोलकाता नाइट रायडर्स, पंजाब किंग्स) यांनी प्रत्येकी दोन विरोधी संघांविरुद्ध १००० हून अधिक धावा केल्या आहेत.
विराटने केएल राहुलच्या विक्रमाशी साधली बरोबरी –
आयपीएल २०२४ मध्ये विराट कोहलीने आतापर्यंत एकूण ६३४ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या बऱ्याच मोसमात संयुक्तपणे ६०० हून अधिक धावा करणारा तो फलंदाज आहे. त्याच्याशिवाय केएल राहुलनेही ही कामगिरी केली आहे. विराट कोहलीने आयपीएल २०१३, २०१६, २०२३ मध्ये ६०० हून अधिक धावा केल्या होत्या. त्यांच्याशिवाय ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नर यांनी प्रत्येकी तीन हंगामात ६०० हून अधिक धावा केल्या आहेत, तर फाफ डुप्लेसिसने दोन हंगामात ६०० हून अधिक धावा केल्या आहेत.
हेही वाचा – PBKS vs RCB : रजत पाटीदारने रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
आरसीबीने पंजाब किंग्जला दिले २४२ धावांचे लक्ष्य –
सामन्याबद्दल बोलायचे तर, ‘करो या मरो’ या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जला २४२ धावांचे लक्ष्य दिले आहे. विराट कोहलीने सर्वाधिक ९२ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून ७ चौकार आणि ६ षटकार आले. तर रजत पाटीदारने २३ चेंडूत ५५ आणि कॅमेरून ग्रीनने २७ चेंडूत ४६ धावा केल्या. शेवटी दिनेश कार्तिकने सात चेंडूत १८ धावा केल्या. हर्षल पटेलने ३ विकेट घेतल्याने त्याच्याकडे पर्पल कॅप आली आहे.