कुलदीप यादवचे ८८ धावांत ६ बळी; अभिनव मुकुंद सामनावीर

फक्त अध्र्या तासात इंडिया रेडने इंडिया ग्रीनचे शेपूट गुंडाळून दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेच्या सलामीच्या लढतीत २१९ धावांनी विजय मिळवला. दीडशतकी खेळी उभारणाऱ्या अभिनव मुकुंदला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

इंडिया ग्रीन संघाने ७ बाद २१७ धावांवर आपला दुसरा डाव पुढे सुरू केला. मात्र ५६.२ षटकांत २७७ धावांवर त्यांचा डाव आटोपला. कर्णधार सुरेश रैनाने ९० धावांची झुंजार खेळी साकारली. रैनाने १०१ चेंडूंत ११ चौकार आणि ३ षटकारांसह ही खेळी साकारली; परंतु ४९७ धावांचे लक्ष्य गाठणे कठीण असल्याचे तिसऱ्या दिवसअखेरच स्पष्ट झाले होते.

‘चायनामॅन’ गोलंदाज कुलदीप यादवने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना ८८ धावांत ६ बळी मिळवले. या मनगटी फिरकी गोलंदाजाने दोन्ही डावांत मिळवून १२० धावांत ९ बळी घेतले.

प्रकाशझोतात झालेल्या या सामन्यातील अखेरच्या दिवशी दुपारी १०.२ षटकांतच निकाल लागला. अशोक दिंडा नथ्थू सिंगच्या उसळणाऱ्या चेंडूवर मिड-ऑनला झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर कुलदीपने शतकाकडे कूच करणाऱ्या रैनाला तंबूची वाट दाखवली. मग प्रग्यान ओझा जेमतेम ७ धावा काढून बाद झाला आणि इंडिया ग्रीनचा डाव संपुष्टात आला.

 

संक्षिप्त धावफलक

  • इंडिया रेड : १६१ आणि ४८६
  • इंडिया ग्रीन : १५१ आणि (लक्ष्य ४९७) ५६.२ षटकांत सर्व बाद २७७ (सुरेश रैना ९०, रॉबिन उथप्पा ७२; कुलदीप यादव ६/८८)
  • निकाल : इंडिया रेड २१७ धावांनी विजयी
  • गुण – इंडिया रेड : ६, इंडिया ग्रीन : ०.