इंडियन बॅडमिंटन लीगच्या लिलावात जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा खेळाडू ली चोंग वुई याने सर्वाधिक किंमत मिळवली असली, तरी या लिलावाद्वारे भारतीय बॅडमिंटनपटू मालामाल झाले आहेत. तीन वेळा ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकणारी टिने बाऊन, पुरुष दुहेरीतील अव्वल क्रमांकाचा खेळाडू कार्सटन मोर्गेन्सन तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती किएन किएट कू आणि बून होएंग तान यांना मिळालेल्या रकमेपेक्षा भारताच्या अव्वल खेळाडूंनी मिळवलेली किंमत जास्त आहे. सहा फ्रँचायझींनी भारतीय खेळाडूंवर तब्बल ८ लाख ६१ हजार अमेरिकन डॉलरची बोली लावली आहे. याविषयी भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अखिलेश दास गुप्ता म्हणाले, ‘‘भारतीय बॅडमिंटनला झळाळी देण्यासाठी आयबीएलची संकल्पना राबवण्यात आली आहे. खेळाडूंना चांगले पैसे मिळत गेले आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करता आली तरच देशातील बॅडमिंटनला झळाळी मिळू शकेल. भारतीय बॅडमिंटनपटूंना करारबद्ध करून फ्रँचायझींनी आमच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.’’