जन्म : ४ एप्रिल १९३३  मृत्यू : १७ जानेवारी २०२०

मुंबई : १९६४मधील इंग्लंडविरुद्धची मद्रास कसोटी ही रमेशचंद्र ऊर्फ बापू नाडकर्णी यांच्या सर्वोत्तम गोलंदाजीसाठी ओळखली जाते. या सामन्यात त्यांनी सलग २१ षटके निर्धाव टाकण्याची विक्रमी कामगिरी केली.

नेहरू स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (१२ जानेवारी १९६४) नाडकर्णी यांनी प्रामुख्याने ब्रायन बॉलूस आणि केन बॅरिंग्टन यांच्यासारख्या फलंदाजांना जखडून ठेवताना २९-२६-३-० असे पृथक्करण राखले. डावाअखेरीस त्यांचे पृथक्करण ३२-२७-५-० असे प्रभावी होते. ११४ मिनिटांच्या गोलंदाजीच्या हप्त्यात २१ सलग षटके म्हणजे १३१ निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम त्यांनी केली. याच मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात नाडकर्णी यांनी दोन डावांत अनुक्रमे ५२* आणि १२२* धावा केल्या.

याआधी १९६०-६१मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्यातील डावात नाडकर्णी यांच्या गोलंदाजीचे पृथक्करण ३२-२४-२३-० असे होते, तर दिल्लीच्या कसोटी सामन्यांत त्यांची कामगिरी ३४-२४-२४-१ अशी होती.

मग १९६४-६५मध्ये मद्रास येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात नाडकर्णी यांनी दोन डावांत ३१ धावांत ५ बळी आणि ९१ धावांत ६ बळी घेण्याची किमया साधली. परंतु डावखुरे फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांच्या उदयानंतर नाडकर्णी यांना भारतीय संघातील स्थान टिकवणे कठीण गेले. १९६७च्या इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून त्यांना वगळण्यात आले. परंतु १९६७-६८च्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले. वेलिंग्टनला भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावताना त्यांनी ४३ धावांत ६ बळी ही कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या दौऱ्यावरून मायदेशात परतल्यानंतर नाडकर्णी यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

पदार्पणात अर्धशतक

विनू मंकड यांच्या जागी मिळालेल्या संधीचे सोने करताना त्यांनी नाबाद ६८ धावा केल्या. परंतु ५७ षटके गोलंदाजी करूनही त्यांना एकही बळी मिळाला नाही. मंकड संघात परतल्यानंतर नाडकर्णी यांना भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी झगडावे लागले. याच वर्षी ते महाराष्ट्राचे कर्णधार झाले.

नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त समजल्यामुळे फारच दु:ख झाले आहे. एका कसोटी सामन्यात त्यांनी टाकलेल्या सलग २१ निर्धाव षटकांच्या किमयेविषयी मी बालपणापासूनच ऐकत आलो आहे. त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी शोक व्यक्त करतो.

– सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू

 

कसोटी         कामगिरी

सामने               ४१

धावा                  १४१४

शतक                 १

अर्धशतके           ७

सर्वोच्च              १२२*

बळी                    ८८

सर्वोत्तम             ६/४३

डावांत ५ बळी        ४

झेल                       २२