आपल्या देशात सामना असला की काही वर्षांपूर्वी भारतीय संघ फिरकीची भरजरी राजेशाही वस्त्र घालून मिरवायचा, पण गेल्याच मालिकेत इंग्लंडने वस्त्रहरण केलं आणि सारं काही बदललं. कारण आपल्याच देशात येऊन त्यांनी आपलीच लक्तरे वेशीवर टांगली. मानहानिकारक पराभवानंतर भारतीय संघाला तोंड लपवायलासुद्धा जागा उरली नव्हती. इंग्लंडमधल्या पराभवाची परतफेड करण्याची भाषा भारतीय खेळाडूंनी केली होती, या पराभवानंतर ते तोंडघशीच पडले. इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता, त्या दौऱ्यातही भारतावर चारही सामने गमावण्याची नामुष्की ओढवली होती. आता तोच ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झालाय. भारताच्या काही खेळाडूंनी कांगारूंचा फडशा पाडायची भाषा केली आहे. पण बोलणं आणि करणं यात फरक असतो. भारतीय आपले हे बोल सत्यात उतरवतात की ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडसारखाच भारताला नेस्तनाबूत करतो, याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष असेल.
विश्वचषक जिंकल्यावर भारताला कसोटी क्रिकेटमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. वेस्ट इंडिजमध्ये एकमेव सामना जिंकत मालिका जिंकली. वेस्ट इंडिज भारतात आल्यावर दोन सामने भारताने जिंकत मालिका खिशात घातली. काही महिन्यांपूर्वी न्यूझीलंडलाही मायदेशात पराभूत केले, पण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासमोर त्यांची डाळ शिजली नाही. दोन्ही देशांमध्ये केलेल्या दौऱ्यात आठही सामन्यांत भारतावर पराभवाची कुऱ्हाड कोसळली. इंग्लंडने भारतात येऊन भारताचा ‘बँड’ वाजवला, अशा परिस्थितीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा सामना कसा करणार हा प्रश्न आहे. भारतीय संघ यापूर्वी फिरकीच्या जिवावर उडत होता, पण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आर. अश्विन, प्रग्यान ओझा आणि अनुभवी हरभजन सिंग यांच्या फिरकीची धार बोथट झाली होती. वेगवान गोलंदाजी कुचकामी ठरले होते. फलंदाजीत ‘शेर’ भारताचा संघ ‘ढेर’ झाला होता. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवागसारखे अनुभवी फलंदाज कुचकामी वाटत होते, त्यामुळे या मालिकेत त्याची बॅट तळपते का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. चेतेश्वर पुजाराकडून मात्र भरपूर अपेक्षा असतील. विराट कोहली फॉर्मात नसला तरी आपली जागा टिकवून आहे, त्याच्याकडूनही अपेक्षा असतील. सलामीच्या जागेसाठी मुरली विजय आणि शिखर धवन यांच्यात चुरस असली तरी एकालाच संधी मिळणार असून त्याने चांगली कामगिरी न केल्यास अखेरच्या दोन सामन्यांसाठी गौतम गंभीर संघात येऊ शकतो. फिरकी गोलंदाजीमध्ये अश्विन, ओझा, हरभजन यांच्या हातात भारताच्या फिरकी परंपरेची लाज असेल. कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ‘मिडास टच’ हरवला असला तरी तो या वेळी कोणते प्रयोग करतो आणि चाणाक्षपणे निर्णय घेऊन भारताला विजय मिळवून देऊ शकतो का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
ऑस्ट्रेलियाच्या संघाने गेल्या १२ सामन्यांमध्ये ८ सामने जिंकलेले आहेत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकच सामना गमावला आहे, यामधूनच त्यांचा फॉर्म काय आहे हे कळून येतो. पण या वेळी संघात रिकी पॉन्टिंग, माइक हसी हे मातब्बर खेळाडू नसतील, हे देखील ध्यानात ठेवायला हवे. ऑस्ट्रेलियाकडे कर्णधार क्लार्क आणि शेन वॉटसन हे दोघे अनुभवी आणि फॉर्मात असलेले खेळाडू आहे आणि त्यांच्याच भोवती ऑस्ट्रेलियाच्या विजयाची गोफ गुंफली जाईल. डेव्हिड वॉर्नरसारखा दुसरा सेहवाग त्यांच्याकडे आहे, तर इडी कोवन या दुसऱ्या सलामीवीराने सराव सामन्यात चांगली फलंदाजी केली आहे. मिचेल जॉन्सन, पीटर सिडल, जेम्स पॅटीन्सन आणि मिचेल स्टार्क ही वेगवान अस्त्र त्यांच्याकडे आहे. नॅथन लिऑन, स्टिव्हन स्मिथ हे फिरकीपटू असून त्यांना ग्लेन मॅक्सवेल आणि झेव्हियर डोहर्टी यांची साथ लाभू शकते.
सध्या दोन्ही संघांवर नजर टाकली की, ऑस्ट्रेलियाचा संघ फॉर्मच्या बाबतीत नक्कीच भारतापेक्षा वरचढ आहे, पण अनुभव आणि मायदेशातील वातावरण, खेळपट्टय़ा या गोष्टींचा विचार केला तर भारत वरचढ दिसतोय. त्यामुळे ही मालिका म्हणजे ‘काँटे की टक्कर’ असेल. धोनी आणि क्लार्क या दोघांच्याही कप्तानीची कसोटी लागेल, कारण ऑस्ट्रेलियासाठी हा खडतर दौरा समजला जात आहे, तर भारताला गेलेली लाच पुन्हा मिळवायची संधी आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये ईर्षां, खुन्नस भरलेली असेल, पण या आक्रमकतेला संयम आणि संयतपणाची झालर जो संघ चढवेल तोच विजयी ठरेल.