आयपीएलच्या २५व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज पृश्वी शॉने नवा विक्रम नोंदवला. पृथ्वीने पहिल्याच षटकात ६ चौकार ठोकत सर्वांना स्तब्ध केले. जलदगती गोलंदाज शिवम मावीने कोलकाताकडून पहिले षटक टाकले. पहिल्याच चेंडूवर मावीने वाईड टाकत दिल्लीला अतिरिक्त धाव दिली. त्यानंतरच्या सर्व चेंडूवर पृथ्वीने चौकार ठोकत नव्या पराक्रमाची नोंद केली.

 

अजिंक्य रहाणेचे ६ चेंडूत ६ चौकार

पृथ्वीने कोलकाताविरुद्ध १८ चेंडूत अर्धशतक ठोकले. यंदाच्या हंगामातील हे वेगवान अर्धशतक ठरले. त्याने शिखर धवनसह पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये दिल्लीने बिनबाद ६७ धावा फलकावर लावल्या. यंदाच्या हंगामातील या पॉवरप्लेमधील सर्वाधिक धावा ठरल्या. पृथ्वीपूर्वी त्याच्याच संघाच्या आणि मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना एका षटकात ६ चौकार ठोकले होते. २०१२च्या हंगामात बंगळुरूचा जलदगती गोलंदाज श्रीनाथ अरविंदविरुद्ध रहाणेने हा कारनामा केला होता. या सामन्यात रहाणेने ६० चेंडूत १०३ धावांची नाबाद खेळी केली होती.

कोलकाताचे दिल्लीला १५५ धावांचे आव्हान

आयपीएल २०२१चा २५वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. शुबमन गिलची चांगली सलामी आणि डावाच्या उत्तरार्धात स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने केलेल्या वादळी खेळीमुळे कोलकाताला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला.

आयपीएलच्या एका डावातील सर्वात महागडे पहिले षटक

  • २७ अबू नेचिम, मुंबई विरुद्ध आरसीबी, चेन्नई, २०११
  • २६ हरभजन, मुंबई विरुद्ध कोलकाता , कोलकाता, २०१३
  • २५ शिवम मावी, कोलकाता विरुद्ध दिल्ली, अहमदाबाद, २०२१ 
  • २३ वरुण आरोन, राजस्थान विरुद्ध आरसीबी, बंगळुरू, २०१९

आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक (दिल्ली )

  • १७ चेंडू – ख्रिस मॉरिस विरुद्ध गुजरात, दिल्ली २०१६
  • १८ चेंडू – ऋषभ पंत विरुद्ध मुंबई, मुंबई २०१९
  • १८ चेंडू – पृथ्वी शॉ विरुद्ध कोलकाता, अहमदाबाद २०२१