News Flash

Euro Cup 2020 : रोमन जिंकले!

इंग्लंडला नमवून इटलीचे युरो चषकावर वर्चस्व

Euro Cup 2020 : रोमन जिंकले!

इंग्लंडला नमवून इटलीचे युरो चषकावर वर्चस्व

लंडन : निराशा, विश्वास आणि पुनरागमन या त्रिसूत्रीच्या बळावर इटलीने जगाला पुन्हा एकदा त्यांचे सामर्थ्य दाखवून दिले. जवळपास वर्षभरापूर्वी करोनाच्या कहरात पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या इटलीने रविवारी इतिहास घडवला. क्षणाक्षणाला हिंदोळे घेणाऱ्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत झुंजार इटलीने चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे आतापर्यंत यशस्वीपणे पेलणाऱ्या इंग्लंडला पेनल्टी शूटआऊटमध्ये नामोहरम केले.

रॉबटरे मान्चिनी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या इटलीने हॅरी केनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडवर १-१ (३-२) असा विजय मिळवून दुसऱ्यांदा युरो चषक उंचावला. तर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या इंग्लंडला मात्र ५५ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतरही जेतेपदाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे एकीकडे अश्रूंचा बांध फुटलेले इंग्लंडचे खेळाडू आणि चाहते, तर दुसरीकडे जेतेपदाच्या जल्लोषात न्हाऊन गेलेले इटालियन्स, असे चित्र युरोप खंडात रविवारी पाहायला मिळाले.

ऐतिहासिक वेम्बले स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये कमालीचा संघर्ष पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. प्रथमच युरो चषकाच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या इंग्लंडने त्याच थाटात सुरुवात करताना अवघ्या दुसऱ्याच मिनिटाला आघाडी मिळवली. किरॅन ट्रिपियरने उजव्या दिशेने दिलेल्या पासला ल्यूक शॉ याने अप्रतिमरीत्या गोलजाळ्याची दिशा दाखवली तेव्हा स्टेडियममधील इंग्लंडच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. शॉ याचा हा कारकीर्दीतील पहिलाच गोल ठरला.

मध्यांतरापर्यंत इंग्लंडला आघाडी कायम राखण्यात अपयश आले, परंतु दुसऱ्या सत्रात अतिबचावात्मक पावित्रा त्यांच्या अंगलट आला. अखेर सातत्याने इंग्लंडच्या गोलजाळ्यावर हल्ले करणाऱ्या इटलीसाठी अनुभवी लिओनाडरे बोनुचीने ६७व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. ३४ वर्षीय बोनुचीने २०१९ नंतर प्रथमच इटलीसाठी गोल नोंदवला.

त्यानंतर अतिरिक्त वेळेतही उभय संघांना गोल करण्यात अपयश आल्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत लांबला. तेथे मात्र इटलीने अनुभवाच्या बळावर सरशी साधली आणि इंग्लंडच्या तोंडातून जेतेपदाचा घास हिरावला.

पुरस्कार विजेते

* स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : जिआनलुइगी डोनारुमा (इटली)

* सामनावीर : लिओनाडरे बोनुची (इटली)

* गोल्डन बूट : ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)

* स्पर्धेतील सर्वोत्तम युवा खेळाडू : प्रेडी (स्पेन)

इटली-इंग्लंडच्या चाहत्यांमध्ये हाणामारी

इटलीने इंग्लंडचे जेतेपदाचे स्वप्न उद्ध्वस्त केल्यामुळे अंतिम सामना संपल्यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी इटलीच्या पाठिराख्यांवर आक्रमण केल्याची चित्रफीत तसेच छायाचित्रे समाजमाध्यमांवर पसरली आहेत. यापैकी काही दृश्ये ही वेम्बले स्टेडियमबाहेरील असल्याचे समजते. इंग्लंडच्या चाहत्यांनी इटलीच्या झेंडय़ाचाही मान न राखता रस्त्यावर उतरून झेंडा जाळल्याचे आणि त्यावर थुंकल्याचे निदर्शनास आले.

इंग्लंडच्या खेळाडूंविरुद्ध वर्णभेदी टिप्पणी

इटलीविरुद्धच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल करण्यात अपयशी ठरलेल्या इंग्लंडच्या तीन खेळाडूंवर त्यांच्याच देशातील काही चाहत्यांनी वर्णद्वेषी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मार्कस रशफोर्ड, जेडन सँचो आणि बुकायो साका या तिघांना पेनल्टीवर गोल करणे जमले नाही. दरम्यान, इंग्लंड फुटबॉल संघटनेने खेळाडूंविषयी समाजमाध्यमांवर अपशब्द वापरणाऱ्या तसेच वर्णभेदाचे समर्थन करणाऱ्या प्रतिक्रियांबाबत खंत व्यक्त केली आहे. तसेच यासंबंधी पोलीस तक्रार नोंदवून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही संघटनेने स्पष्ट केले.

इटलीचे मायदेशात जल्लोषात स्वागत

युरो चषक विजेत्या इटलीचे सोमवारी फटाक्यांच्या कडकडाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात मायदेशी स्वागत करण्यात आले. रोम येथील लिओनाडरे दा व्हिन्सी विमानतळावर इटलीच्या खेळाडूंच्या आगमनासाठी चाहत्यांनी घोळका केला होता. ‘ग्रॅझी अझुरी’ ‘व्हिक्टोरियस इटली’ असा मजकूर लिहिलेले फलक या वेळी दिसले. गाडय़ांच्या एका सुरात हॉर्न वाजवून चाहत्यांनी खेळाडूंचे अभिवादन केले. खेळाडूंची खुल्या गाडीतून मिरवणूकही काढण्यात आली. त्यानंतर इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ माटेरेला यांनी इटलीच्या खेळाडूंची भेट घेतली. विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पराभव पत्करणारा इटलीचाच माटेओ बेरेट्टिनीसुद्धा या वेळी उपस्थित होता.

फिफा विश्वचषक आणि युरो चषक या स्पर्धा मिळून इटलीने एकंदर सहावे विजेतेपद मिळवले. यामध्ये चार विश्वचषक (१९३४, १९३८, १९८२, २००६) आणि दोन युरो चषकांचा (१९६८, २०२१) समावेश आहे.

इंग्लंडला युरो आणि फिफा विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धामध्ये सातव्यांदा पेनल्टी शूटआऊमध्ये पराभव पत्करावा लागला.

३४ सलग ३४ सामन्यांपासून अपराजित राहण्याची इटलीची मालिका अद्याप कायम आहे.

इंग्लंडच्या चाहत्यांकडून हुल्लडबाजी

इटलीने इंग्लंडचे जेतेपदाचे स्वप्न उद्ध्वस्त केल्यामुळे अंतिम सामना संपल्यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी इटलीच्या पाठिराख्यांवर आक्रमण केल्याची चित्रफीत तसेच छायाचित्रे समाजमाध्यमांवर पसरली आहेत. यापैकी काही दृश्ये ही वेम्बले स्टेडियमबाहेरील असल्याचे समजते. इंग्लंडच्या चाहत्यांनी इटलीच्या झेंडय़ाचाही मान न राखता रस्त्यावर उतरून झेंडा जाळल्याचे आणि त्यावर थुंकल्याचे निदर्शनास आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2021 4:15 am

Web Title: italy beats england in a shootout to win the euro 2020 zws 70
टॅग : Euro Cup 2020
Next Stories
1 ऑलिम्पिकसाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रक्रियेला विलंब
2 Euro Cup Final:पेनल्टी मिस करणाऱ्या इंग्लंडच्या ३ खेळाडूंवर वर्णभेदी टीका; पंतप्रधान म्हणाले…
3 “…म्हणून Euro Cup स्पर्धेत इंग्लंडचाच विजय”; न्यूझीलंड क्रिकेटपटूंचा टोमणा
Just Now!
X