*   आयपीएलमधील श्रीलंकन खेळाडू पंचांना तामिळनाडूत प्रवेशबंदी
*   जयललितांचा द्राविडी बाणा
*   पंतप्रधानांना पत्र लिहून इशारा
श्रीलंकेतील तामिळी जनतेवर सुरू असलेला अनन्वित अत्याचार आता आयपीएलमध्ये खेळणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंच्या मुळावर उठू पाहत आहे. आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या श्रीलंकन खेळाडू, पंच, सामनाधिकारी व अन्य कोणीही पदाधिकारी यांना तामिळनाडूत ‘प्रवेश बंदी’ पुकारण्यात आली आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनीच हा फतवा काढला असून तशा आशयाचे पत्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठवले आहे. तामिळनाडूत होणाऱ्या आयपीएलच्या कोणत्याही सामन्यात एकही श्रीलंकन आढळला तर ताबडतोब सामना रद्द केला जाईल असा गर्भित इशाराच जयललितांनी दिला आहे.
येत्या ३ एप्रिलपासून आयपीएलचे बिगुल वाजणार आहे. २६ मेपर्यंत चालणाऱ्या या महास्पर्धेचे अनेक सामने तामिळनाडूत खेळवले जाणार आहेत. श्रीलंकेतील तामिळींची परिस्थिती आणि त्यांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि प्रमुख विरोधी पक्ष द्रमुक यांच्यात अहमहमिका सुरू आहे. श्रीलंकेतील तामिळींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात केंद्र सरकारच्या निष्क्रीयतेला कंटाळून द्रमुकने केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता जयललिता यांनी मनमोहन सिंग यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी आयपीएलचे माध्यम निवडले आहे. श्रीलंकेचा कोणताही खेळाडू, पंच, सामनाधिकारी अथवा पदाधिकारी तामिळनाडूतील सामन्यात सहभागी झाला तर त्याचे परिणाम वाईट होतील, परिणामी अशा व्यक्तींचा समावेश असलेले सामनेच तामिळनाडूत आयोजित करू नयेत असा सल्ला केंद्र सरकारने आयपीएलचे जनक असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) द्यावा असे जयललिता यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मैत्रीपूर्ण सामन्यासाठी तामिळनाडूत दाखल झालेल्या श्रीलंकेच्या फुटबॉल संघाला जयललिता यांनी परत पाठवले होते. हा सामना आयोजित करणाऱ्या पदाधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते.
श्रीलंका क्रिकेटला सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा
कोलंबो : आयपीएल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंच्या सुरक्षिततेवरून उद्भवलेला वादाच्या पाश्र्वभूमीवर श्रीलंका क्रिकेटला सरकारच्या भूमिकेची प्रतीक्षा आहे. याप्रकरणी परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा झाली असून, लवकरच खेळाडूंना यासंदर्भात योग्य सूचना देण्यात येतील असे क्रिकेट श्रीलंकाचे सचिव निशांता रणतुंगा यांनी सांगितले. श्रीलंकेचे १३ खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होत असून, तामिळनाडू राज्यातल्या विरोधानंतर चेन्नई सुपर किंग्सने नुवान कुलशेकरा आणि अखिला धनंजया या श्रीलंकेच्या खेळाडूंना वगळण्याचा निर्णय घेतला आहे.