उलान-उदे (रशिया) : भारताच्या मंजू राणी (४८ किलो) हिने व्हेनेझुएलाच्या बॉक्सरवर निर्विवाद वर्चस्व गाजवत रशिया येथे सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

सहाव्या मानांकित मंजू राणी हिने रोजास टायोनिस सेडेनो हिचे आव्हान सहजपणे परतवून लावले. आता जागतिक स्पर्धेत पदकाची कमाई करण्यासाठी मंजूला एका विजयाची आवश्यकता आहे. मात्र तिच्यासाठी हे आव्हान सोपे असणार नाही. तिला उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित आणि गेल्या वेळच्या कांस्यपदक विजेत्या किम यांग हिच्याशी लढत द्यावी लागेल. मंजू आणि दक्षिण कोरियाच्या यांग यांच्यातील लढत गुरुवारी रंगणार आहे.

मंजू हिने या वर्षी बल्गेरिया येथे झालेल्या स्ट्रँडजा स्मृती बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर मंजूने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही शानदार सुरुवात केली. दोघींनीही सुरुवातीपासूनच बचावात्मक खेळावर भर दिला असला तरी रोजास हिच्यापेक्षा मंजूचे ठोसे अचूक आणि प्रभावी ठरत होते. त्यामुळेच पंचांनी एकमताने मंजूच्या पारडय़ात निकाल दिला.

मंजू बम्बोरिया पराभूत

मंजू राणी हिने सोमवारी भारतासाठी विजयाची नोंद केली असली तरी मंजू बम्बोरिया (६४ किलो) हिला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. इटलीच्या चौथ्या मानांकित अँजेला कॅरिनी हिने मंजूला ४-१ असे हरवले. युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत मंजूला कॅरिनीकडून १-४ असे पराभूत व्हावे लागले होते.

मेरी कोमच्या अभियानाला आजपासून प्रारंभ

सहा वेळा जगज्जेती ठरलेली एम. सी. मेरी कोम (५१ किलो) हिच्या आव्हानालाही मंगळवारी सुरुवात होणार आहे. पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मेरी कोमला थायलंडच्या जुटामास जिटपाँग हिच्याशी झुंज द्यावी लागेल. बऱ्याच काळानंतर रिंगणात उतरणाऱ्या मेरी कोमने सातव्या जागतिक सुवर्णपदकाचे लक्ष्य ठेवले आहे.