श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये पसरलेल्या भ्रष्टाचाराची सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून कसून चौकशी सुरू आहे. ही चौकशी करणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी अॅदलेक्स मार्शल यांनी, ‘सर्वाधिक घोटाळेबाज सट्टेबाज भारतात आहेत’ असा दावा करीत धोक्याचा इशाराच जणू दिला आहे.

काही दिवसांपूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्यावर आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठपका ठेवण्यात आला. जयसूर्यावर सामनानिश्चितीचे आरोप नसले तरी चौकशी अधिकाऱ्यांना सहकार्य न केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. नुकतीच ‘आयसीसी’च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इंग्लंड आणि श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंशी संपर्कात आलेल्या सट्टेबाजांची माहिती उघड केली. याबाबत मार्शल म्हणाले,  भ्रष्टाचारात अडकलेले श्रीलंकेतील बरेच सट्टेबाज हे स्थानिक आणि भारतीय आहेत. जगातील अन्य भागांमध्ये सट्टेबाजांचा आढावा घेतल्यास इथेही भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

पाकिस्तानचा लेग-स्पिनर डॅनिश कनेरियाने गुरुवारीच भारतीय सट्टेबाज अनू भटकडून सामन्याची निश्चिती करण्यासाठी पैसे घेतल्याचा कबुलीजबाब दिला होता. या कबुलीनंतर काही तासांतच मार्शल यांनी दावा केल्यामुळे ही एक प्रकारे भारतासाठी धोक्याची घंटा आहे. क्रिकेटमधील सामनानिश्चिती सर्वप्रथम २००० साली प्रकाशात आली. त्या प्रकरणात समाविष्ट असलेले बरेच सट्टेबाज हे भारतीय वंशाचेच होते.

भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या सट्टेबाजांची छायाचित्रे आणि अन्य माहिती आम्ही जारी केली आहेत. खेळाडू यासंदर्भात आम्हाला अधिक माहिती देऊ शकतील अशी आशा आहे. आता इंग्लंड आणि श्रीलंकेच्या संघांमधील खेळाडूंकडून नवी माहिती मिळू शकेल, अशी आशा मार्शल यांनी प्रकट केली.