*   पुरुषांमध्ये कोल्हापूर-सांगली आमने-सामने
*   महिलांमध्ये उपनगरसमोर साताऱ्याचे आव्हान
विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या मुंबई आणि मुंबई उपनगरला भाई नेरूरकर स्मृतिचषक आमंत्रितांच्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या पुरुष गटात धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. बलाढय़ मुंबईला कोल्हापूरने चीतपट केले. आता अंतिम फेरीत त्यांच्यासमोर सांगलीचे आव्हान आहे. महिलांमध्ये मुंबई उपनगर आणि अहमदनगर यांच्यात अंतिम फेरीचा मुकाबला रंगणार आहे.
उपांत्य फेरीच्या चुरशीच्या लढतीत कोल्हापूरने मुंबईचे आव्हान १५-१४ असे एका गुणाने संपुष्टात आणले. कोल्हापूरतर्फे योगेश मोरेने २.३० मि., १.२० मि. आणि २ गडी बाद केले. बाळासाहेब पिकार्डे १.४० मि., २.३० मि. संरक्षण करताना ४ गडी बाद केले.
उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत सांगलीने पुण्याचा २ गुण, ७ मिनिटे आणि ३० सेकंद राखून पराभव केला. सांगलीतर्फे युवराज जाधवने २.१० मि., १ मि. संरक्षण करताना ५ गडी बाद करण्याची किमया साधली. शीतल पाटीलने १.२० मि. संरक्षण करताना २ गडी बाद केले. मिलिंद चावरेकरने १.१० मि. संरक्षण करतानाच ३ गडी टिपले. दरम्यान मुंबई उपनगरचे पुरुष गटातील आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.
महिलांमध्ये मुंबई उपनगरने चुरशीच्या लढतीत ठाण्यावर एका गुणाने मात केली. शिल्पा जाधवने २.२० मि. संरक्षण करताना ४ गडी टिपत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. श्रद्धा चौगुलेने ४ गडी टिपत तिला चांगली साथ दिली. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत साताऱ्याने उस्मानाबादवर ५ गुणांनी मात केली. साताऱ्यातर्फे प्रियंका येळेने ३.२० मि. आणि १ मि. संरक्षण करताना ३ गडी बाद केले. करिश्मा नगारजीने १.२० मि., १.५० मि. संरक्षण करताना ४ गडी टिपले.
किशोरी गटामध्ये पुणे आणि अहमदनगर संघाने अंतिम फेरीत धडक मारली. पुण्याने सांगलीचा एक डाव आणि ४ गुणांनी विजय मिळवला. दुसऱ्या अटीतटीच्या लढतीत अहमदनगरने ठाण्यावर निसटती मात केली. ठाण्याने मध्यंतराला घेतलेली आघाडी मोडून काढत अहमदनगरने ११-१० अशी अवघ्या एका गुणाने मात केली. दुसऱ्या अटीतटीच्या लढतीत अहमदनगरने ठाण्यावर निसटती मात केली. ठाण्याने मध्यंतराला घेतलेली आघाडी मोडून काढत अहमदनगरने ११-१० अशी अवघ्या एका गुणाने मात केली.