फ्रेंच खुल्या स्पर्धेचे विक्रमी आठवे जेतेपद कमावणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालला विम्बल्डन स्पर्धेसाठी पाचवे मानांकन देण्यात आले आहे, तर त्याचा देशबांधव डेव्हिड फेररला चौथे मानांकन देण्यात आले आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचला अव्वल मानांकन देण्यात आले आहे, तर ग्रास कोर्टवर जेतेपदाचा प्रबळ दावेदार असणाऱ्या रॉजर फेडररला दुसरे तर घरच्या मैदानावर प्रेक्षकांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळणाऱ्या अँडी मरेला तृतीय मानांकन देण्यात आले आहे.
१२ ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असूनही नदाल मानांकन यादीत पाचव्या स्थानी आहे. विम्बल्डन संयोजक मानांकन देताना खेळाडूची ग्रासकोर्टवरील कामगिरी आणि जागतिक क्रमवारीतील स्थान लक्षात घेतात. गेल्या वर्षी नदालला या स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. यामुळे मानांकनात नदालची घसरण झाली आहे. महिलांमध्ये पाच वेळा जेतेपदाची कमाई करणाऱ्या सेरेना विल्यम्सला अग्रमानांकन देण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावरही सेरेनाने कब्जा केला होता. बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काला दुसरे तर रशियाच्या मारिया शारापोव्हाला तृतीय मानांकन देण्यात आले आहे.
दिविज-राजाचे ग्रँडस्लॅम पदार्पण
लंडन : यंदाच्या हंगामात शानदार प्रदर्शन करणाऱ्या दिविज शरण आणि पुरव राजा या जोडीला विम्बल्डनच्या माध्यमातून ग्रँडस्लॅम पदार्पणाची संधी मिळणार आहे. पात्रता फेरीत चेक प्रजासत्ताकच्या आंद्रेस हैदर-मॉरुर आणि जिरी वेस्ली या जोडीने माघार घेतल्यामुळे दिविज-राजा जोडीचा विम्बल्डनच्या मुख्य फेरीतला प्रवेश पक्का झाला. लिएण्डर पेस, महेश भूपती, रोहन बोपण्णा यांच्यासह ही नवीन जोडी विम्बल्डनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.