पहिल्या सामन्यातलं अपयश मागे झटकत न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरोने दुसऱ्या टी-२० सामन्यात शतकी खेळी केली. ५८ चेंडुत १०९ धावांची खेळी करत मुनरोने आपल्या टी-२० कारकिर्दीतलं दुसरं शतक झळकावलं. पहिल्या विकेटसाठी मुनरोने मार्टीन गप्टीलसोबत १०५ धावांची भागीदारी केली. आपल्या शतकी खेळीत मुनरोने ७ उत्तुंग षटकार आणि ७ खणखणीत चौकार लगावले. मुनरोने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने भारतासमोर १९७ धावांचं आव्हान ठेवलं.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाने सामन्यात आक्रमक सुरुवात केली. कॉलिन मुनरोने पहिल्या चेंडुपासून आक्रमक खेळी केली. त्याला मार्टीन गप्टीलनेही चांगली साथ दिली. आजच्या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी गप्टील-मुनरो जोडीचे सोपे झेल टाकत न्यूझीलंडच्या फलंदाजांना सामन्यावर पकड बसवायला मदत केली.

भारताकडून युझवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी १-१ बळी घेतला. न्यूझीलंडची सलामीची जोडी फोडण्याचे अनेक प्रयत्न भारतीय गोलंदाजांनी केले, मात्र मुनरोच्या आक्रमक खेळीपुढे त्यांचा निभाव लागला नाही.