आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी भारताची सुधा सिंग ही स्टीपलचेसमध्ये वर्चस्व राखणार का, हीच उत्सुकता शुक्रवारी होणाऱ्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पुरुष व महिला या दोन्ही गटात होणाऱ्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीविषयी उत्कंठा निर्माण झाली आहे.
सुधा सिंग हिने नुकत्याच झालेल्या आंतरराज्य स्पर्धेत ९ मिनिटे ४५.६ सेकंद हा राष्ट्रीय विक्रम नोंदवत अपेक्षा उंचावल्या आहेत. तिने २०१०मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तिला प्रामुख्याने जपान, कझाकिस्तान व चीनच्या खेळाडूंकडून चिवट लढत मिळण्याची शक्यता आहे.
स्पर्धेतील वेगवान संघ ठरविण्यासाठी होणाऱ्या १०० मीटर रिले शर्यतीच्या प्राथमिक फेऱ्या शुक्रवारी सायंकाळच्या सत्रात होणार आहे. अनुकूल वातावरण व प्रेक्षकांचा पाठिंबा याचा फायदा घेत चांगली कामगिरी करण्याची भारताला संधी आहे. रिले शर्यतीत चीन, जपान यांच्याबरोबरच अरब देशांचे संघही जय्यत तयारीनिशी उतरणार आहेत.
महिलांच्या विभागात १५०० मीटर धावणे, हातोडाफेक, तिहेरी उडी या क्रीडाप्रकाराच्याही अंतिम फेरी होणार आहेत. पुरुष विभागात १५०० मीटर धावणे, ११० मीटर अडथळा व ३००० मीटर स्टीपलचेस या क्रीडाप्रकारांच्या अंतिम फेऱ्या होणार आहेत. याखेरीज महिलांच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेलाही शुक्रवारी सुरुवात होईल.