भारतीय कर्णधार विराट कोहली हा सध्या इतर खेळाडूंशी होणाऱ्या तुलनेमुळे चर्चेत असतो. अनेकदा त्याची तुलना आधुनिक क्रिकेटमधील खेळाडूंशी म्हणजे केन विल्यमसन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याशी केली जाते. तर काही वेळा विक्रमादित्य सचिन तेंडुलकरशी करण्यात येते. याशिवाय त्याच्या नेतृत्वशैलीची तुलना धोनीशीही केली जाते. नुकतीच त्याची तुलना यशस्वी ऑस्ट्रेलियन संघाशी करण्यात आली आहे. ९० आणि २००० च्या दशकातील ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाप्रमाणेच विराटचीही नेतृत्वशैली असल्याचे मत माजी भारतीय क्रिकेटपटूने व्यक्त केले.

विराट कोहली संघाचे नेतृत्व करत असताना त्याला पराभवाची पर्वा नसते. कारण तो कायम विजय मिळवण्यासाठीच खेळतो. त्याच्या त्या पवित्र्याकडे पाहिल्यावर मला ९० च्या आणि २०००च्या सुरूवातीच्या दशकातील ऑस्ट्रेलियाच्या संघाची आठवण येते. तेदेखील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी खेळायचे आणि म्हणूनच ते यशस्वी ठरले. तुम्ही मैदानावर जाऊन खेळलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे आणि संघासाठी विजयश्री खेचून आणली पाहिजे. या प्रयत्नात तुम्ही पराभूत झालात, तर मात्र तो खेळाचा भाग असतो आणि विराट हे नीट जाणतो”, अशा शब्दात भारताचे माजी लेग स्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी विराटची स्तुती केली.

“विराट कोहलीच्या नेतृत्वातही एक वेगळी चमक आहे. त्याचा मैदानातील वावरच खेळाडूंमध्ये ऊर्जा निर्माण करतो. गोलंदाजांसाठी त्याच्या डोक्यात कायम नव्या कल्पना असतात. त्यानुसार तो मैदानावर विविध योजना राबवतो, पण शेवटी सामन्याचा किंवा स्पर्धेचा निकाल महत्त्वाचा असतो”, असे सांगत त्यांनी विराटला कर्णधार म्हणून सुधारणेला वाव असल्याचेही नमूद केले.

“धोनी आणि विराट हे दोघेही खूप भिन्न प्रकारचे कर्णधार आहेत. विराट हा खूप आक्रमक कर्णधार आहे. तो मैदानावर व्यक्त होताना कधीही लाजत नाही. याऊलट धोनी अतिशय शांत कर्णधार होता. सामन्यात कितीही तणाव असेल, तरीही त्याच्या चेहऱ्यावरील हावभावातून त्याच्या मनात काय विचार सुरू आहे याबद्दल कधीही थांगपत्ता लागत नसे. खरं सांगायचं तर धोनी हा गोलंदाजांचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वामुळे गोलंदाजांना मदत मिळायची. म्हणूनच विराटपेक्षा धोनी गोलंदाजांचा लाडका कर्णधार असल्याचे अनेक जण सांगतात”, असेही त्यांनी सांगितले.