विश्वविजेतेपदाच्या लढतीत मॅग्नस कार्लसनविरुद्ध पराभूत झाल्यानंतर टीकाकारांचे लक्ष्य बनलेल्या विश्वनाथन आनंदने येथील आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली आहे. अन्य खेळाडूंपेक्षा अध्र्या गुणाची आघाडी घेणाऱ्या आनंदने विजेतेपदाच्या आशा उंचावल्या आहेत.
प्रगत गुणांचा निकष लावल्यास आनंद हा अन्य खेळाडूंपेक्षा दीड गुणाने आघाडीवर आहे. दहाव्या फेरीत त्याला शाख्रीयर मामेद्यारोव्ह या अझरबैजानच्या खेळाडूशी खेळावे लागणार आहे. या फेरीसह उर्वरित पाच फेऱ्यांमध्ये त्याला पांढऱ्या मोहऱ्यांच्या साहाय्याने खेळण्याचा फायदा मिळणार आहे.
आनंदच्या खालोखाल लेव्हॉन आरोनियन असून त्याचे पाच गुण झाले आहेत. त्याला व्हेसेलीन टोपालोव्ह याच्याशी खेळावे लागणार आहे. रशियाचे सर्जी कार्याकीन व व्लादिमीर क्रामनिक यांचे प्रत्येकी साडेचार गुण झाले आहेत. आनंद याने या स्पर्धेत अतिशय सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रत्यय घडविला आहे. टोपालोव्हविरुद्धच्या डावात विजय मिळवताना त्याने केलेले डावपेच खरोखरीच त्याच्या विश्वविजेतेपदास शोभतील असेच होते. त्याला शाख्रीयरविरुद्ध खेळावे लागणार आहे. शाख्रीयरने या स्पर्धेत अनेक अनुभवी खेळाडूंवर मात केली आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध आनंदला गाफील न राहता खेळावे लागणार आहे. आनंदला आंद्रेकीन व स्वेडलर यांच्याविरुद्ध पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याचा फायदा मिळणार आहे. क्रामनिकविरुद्ध होणारा डावही आनंदसाठी महत्त्वाचा असेल. जर ही स्पर्धा आनंदने जिंकली तर विश्वविजेतेपदाच्या मालिकेत त्याचे दिमाखात पुनरागमन असेल. हे यश टीकाकारांना चोख उत्तर देणारे असेल.