पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान हा पाकिस्तानच्या निवडणुकीत यंदा केंद्रस्थानी असल्यामुळे पाकिस्तानचे बहुतांश आजी-माजी क्रिकेटपटू यंदा मतदानासाठी विशेषत्वाने पुढे सरसावले आहेत. पाकिस्तानचा माजी महान वेगवान गोलंदाज वासीम अक्रम तर केवळ मतदानासाठी विमानाने बुधवारी लंडनहून पाकिस्तानात दाखल झाला.

इम्रान खानला निवडणुकीत बहुमत मिळावे, यासाठी अनेक आजी-माजी क्रिकेटपटू त्याच्या प्रचारात व्यग्र झाले होते. तर अक्रमसारख्या विदेशात राहणाऱ्या क्रिकेटपटूंनीदेखील ट्विटरवरून प्रचारयुद्धात रंग भरले होते. अक्रमने त्याच्या ट्विटरवरून ‘परिवर्तनाची वेळ आली आहे. आपला देश, आपला इतिहास आणि कर्णधाराला मतदान करा’ असे आवाहन केले होते. तसेच प्रत्यक्ष निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अक्रमने त्याच्या कुटुंबासह लंडनहून थेट पाकिस्तानात दाखल होत मतदानाचा हक्क बजावला. अनेक क्रिकेटपटू आणि क्रिकेटप्रेमींना इम्रान खान हा त्यांचा पुढील पंतप्रधान व्हावा ही इच्छा आहे. एक आदर्श क्रिकेटपटू आणि कर्णधार हा आता राजकारणी म्हणून तुम्हाला सामोरा येत आहे. एक माणूस जो देशाची सेवा करण्यासाठीच जन्माला आला आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली १९९२ साली क्रिकेटचे विश्वविजेतेपद लाभले होते. त्याच्याच नेतृत्वाखाली हा देश एक महान लोकशाही देश बनू शकतो. त्यालाच मतदान करा’’ असेही अक्रमने आवाहनात म्हटले आहे.