उर्वरित कसोटी सामन्यांत संघ पुनरागमन करेल लेहमन यांचा विश्वास
अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱया कसोटी सामन्याचा शेवट अनिर्णित झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन नाराज झाले. तरी, ऑस्ट्रेलियाने तिसऱया कसोटीत केलेल्या गोलंदजीवर लेहमन समाधानी आहेत.
उर्वरित सामन्यांत संघ पुनरागमन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. लेहमन म्हणाले, ‘व्हाईट वॉश’चे संकट टाळू शकलो हीच आम्ही संघासाठीची चांगली सुरूवात समजून पुढच्या कसोटीमध्ये यजमान इंग्लंडसंघावर वरचढ ठरू. मला संघावर विश्वास आहे. मालिका २-२ अशी बरोबरीत रोखण्यास संघातील प्रत्येक खेळाडू आपली शंभर टक्के कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.
तिसरा कसोटी सामना आमच्या बाजूचा होता. इंग्लंड संघावर दबाव निर्माण करण्यास संघाला यश आले होते. आता संघाला चांगली सुरुवात मिळाली आहे” असेही लेहमन म्हणाले.   
‘दैव देते, अन् कर्म नेते’, याचा प्रत्यय अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला आला.ऑस्ट्रेलियाने अखेरच्या दिवशी इंग्लंडपुढे विजयासाठी ३३२ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यापुढे इंग्लंडची ३ बाद ३७ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण पावसाने ‘खो’ घातला आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशेवर पाणी फिरले. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अनिर्णित राहिला. तीन कसोटी सामन्यांनंतर इंग्लंडकडे २-० अशी आघाडी आहे.