तारांकित आघाडीपटू किलियन एम्बापेचे पॅरिस सेंट-जर्मेन संघाला ‘युएफा’ चॅम्पियन्स लीग फुटबॉलचे जेतेपद मिळवून देण्याचे स्वप्न पुन्हा अधुरेच राहिले. जर्मन क्लब बोरुसिया डॉर्टमंडने सेंट-जर्मेनवर विजय मिळवताना अंतिम फेरीत धडक मारली. डॉर्टमंडने उपांत्य फेरीमधील दोन्ही टप्प्यांतील लढती १-० अशा फरकानेच जिंकल्या. एम्बापेचा हा सेंट-जर्मेनकडून खेळताना अखेरचा हंगाम आहे. या हंगामाअखेरीस त्याचा सेंट-जर्मेनसोबतचा करार संपुष्टात येणार असून त्याने पुन्हा नव्याने करार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तो स्पेनमधील बलाढ्य संघ रेयाल माद्रिदशी करारबद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, त्यापूर्वी सेंट-जर्मेनला चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवून देण्याचे एम्बापेचे ध्येय होते, पण ते साध्य होऊ शकले नाही. २०१७च्या हंगामापूर्वी सेंट-जर्मेनने एम्बापेला मोनाको संघाकडून तब्बल १८ कोटी ३० लाख डॉलर इतक्या मोठ्या किमतीत खरेदी केले होते. त्यानंतर सेंट-जर्मेन संघाने फ्रान्समधील स्थानिक स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजवले. मात्र, चॅम्पियन्स लीगच्या जेतेपदापासून ते कायम दूर राहिले. यंदाही उपांत्य फेरीचा टप्पा ओलांडण्यात सेंट-जर्मेनचा संघ अपयशी ठरला. डॉर्टमंडने विजय मिळवत १ जूनला इंग्लंडमधील वेम्बली स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम लढतीतील आपले स्थान निश्चित केले. हेही वाचा >>>SRH vs LSG: हरली लखनौ, पण आव्हान संपलं मुंबईचं; सनरायझर्सनं अवघ्या पाऊण तासात सामना घातला खिशात! उपांत्य फेरीत दोन्ही टप्प्यांतील लढतींत सेंट-जर्मेनचे पारडे जड मानले जात होते. मात्र, डॉर्टमंडचा भक्कम बचाव भेदणे एम्बापे आणि त्याच्या सहकाऱ्यांना शक्य झाले नाही. डॉर्टमंडच्या घरच्या मैदानावर झालेल्या पहिल्या टप्प्यातील लढतीत यजमानांसाठी आघाडीपटू निकलस फुलक्रुगने निर्णायक गोल केला होता. भारतीय वेळेनुसार, मंगळवारी मध्यरात्री झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील लढतीतही सेंट-जर्मेनला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. घरच्या प्रेक्षकांचा सेंट-जर्मेनला मोठा पाठिंबा मिळाला. मात्र, त्यांचे खेळाडू कामगिरी उंचावण्यात अपयशी ठरले. सामन्याच्या ५०व्या मिनिटाला अनुभवी बचावपटू मॅट्स हुमल्सने हेडर मारून गोल करत डॉर्टमंडला आघाडी मिळवून दिली. अखेर त्याचा हा गोल निर्णायक ठरला. त्यापूर्वी सेंट-जर्मेनच्या वॉरन झाएर-एमरीला गोल करण्याची उत्तम संधी होती, पण ती त्याने वाया घालवली. एम्बापेलाही फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्याने मारलेले फटके डॉर्टमंडचा गोलरक्षक ग्रेगोर कोबेलने अडवले. त्यामुळे डॉर्टमंडने दोन टप्प्यांत मिळून ही लढत एकूण २-० अशा फरकाने जिंकत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठली. ३ बोरुसिया डॉर्टमंडने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग फुटबॉलची अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी ते १९९७ आणि २०१३मध्ये अंतिम लढतीत खेळले होते. विशेष म्हणजे २०१३चा अंतिम सामना इंग्लंडमधील वेम्बली स्टेडियमवर झाला होता आणि यंदाही याच स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्या वेळी बायर्न म्युनिककडून डॉर्टमंडला पराभव पत्करावा लागला होता. यंदाही त्यांची गाठ बायर्नशी पडू शकेल. उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात बायर्नसमोर रेयाल माद्रिदचे आव्हान आहे. आमच्या संघाला विजय मिळवून देण्याचे माझे प्रयत्न अपुरे पडले. आमच्या खेळात अचूकता नव्हती हे सत्य आहे. आम्हाला गोलच्या संधी साधता आल्या नाहीत आणि आम्ही डॉर्टमंडला गोल करण्यापासून रोखूही शकलो नाही. गोल करण्याची जबाबदारी माझी आहे आणि त्यात मी कमी पडलो. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. - किलियन एम्बापे