विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवत भारताने आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेत धडाकेबाज प्रारंभ केला. रितू राणीने केलेल्या सात गोलमुळेच त्यांनी हाँगकाँगचा १३-० असा धुव्वा उडविला.
एकतर्फी झालेल्या या लढतीत रितू राणी हिने दुसऱ्या, सहाव्या, २३व्या, २४व्या, २६व्या, ३४व्या व ५८व्या मिनिटाला गोल करीत संघाच्या यशात महत्त्वाचा वाटा उचलला. वंदना कटारिया हिने १३व्या, १८व्या व ३९व्या मिनिटाला गोल केले. पूनम राणी (६९ वे मिनिट) व जॉयदीप कौर (७० वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करीत संघाच्या विजयास हातभार लावला. या लढतीत खेळाची सूत्रे भारतीय खेळाडूंकडेच होती.
भारताला रविवारी चीनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. साखळी गटातील शेवटच्या लढतीत त्यांना मलेशियाबरोबर लढत द्यावी लागेल. हा सामना २४ सप्टेंबर रोजी होईल.