न्यूझीलंड येथे २०२२मध्ये होणाऱ्या एकदिवसीय प्रकाराच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ६ मार्चला भारताची सलामीची लढत पात्रता फेरीतून आलेल्या संघाशी होणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) ३१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. सलामीच्या लढतीसह स्पर्धेत भारताला गटवार साखळीत आणखी दोन लढती १२ आणि २२ मार्चला पात्रता फेरीतून आलेल्या संघांशीच खेळायच्या आहेत. स्पर्धेत भारताला महत्त्वपूर्ण लढती इंग्लंड (१६ मार्च), ऑस्ट्रेलिया (१९ मार्च) आणि दक्षिण आफ्रिका (२७ मार्च) यांच्याविरुद्ध खेळायच्या आहेत. न्यूझीलंडमध्ये होणारी ही विश्वचषक स्पर्धा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार होती, मात्र त्याऐवजी ही स्पर्धा ४  मार्च ते ३  एप्रिल २०२२ या कालावधीत होणार आहे.

यजमान न्यूझीलंडची सलामीची लढत ४ मार्चला पात्रता फेरीतून आलेल्या संघाशी होणार आहे. भारत, यजमान न्यूझीलंडसह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. अन्य तीन संघ आयसीसीच्या पात्रता फेरीच्या स्पर्धेतून पात्र ठरणार आहेत.

भारताच्या लढती

तारीख  प्रतिस्पर्धी

६ मार्च  पात्रता संघ

१० मार्च न्यूझीलंड

१२ मार्च पात्रता संघ

१६ मार्च इंग्लंड

१९ मार्च ऑस्ट्रेलिया

२२ मार्च पात्रता संघ

२७ मार्च दक्षिण आफ्रिका

..तर भारताचे भवितव्य उज्ज्वल- मिथाली

भारताने २०२२मधील विश्वचषक जिंकल्यास महिला क्रिकेटचे देशातील भवितव्य उज्ज्वल असणार आहे, असे भारताची कर्णधार मिथाली राजने म्हटले. ‘‘करोनामुळे यावर्षी क्रिकेट स्पर्धा खेळता आल्या नाहीत. मात्र पुन्हा क्रिकेटची जोमाने सुरुवात होत असल्याचा आनंद आहे. ‘आयसीसी’च्या स्पर्धामध्ये भारताची गेल्या चार वर्षांत चांगली कामगिरी झाली आहे. या स्थितीत जर भारताने २०२२ मधील विश्वचषक जिंकला तर महिला क्रिकेटची लोकप्रियता देशात मोठय़ा प्रमाणात वाढेल,’’ असे मिथालीने सांगितले.