संदीप कदम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : पद्मश्री पुरस्काराचा मानकरी ठरणे हे माझ्यासाठी खूप खास आहे. मल्लखांब या खेळासाठी हा दिवस संस्मरणीय असून या पुरस्कारामुळे मल्लखांबाला राजमान्यता मिळेल आणि देशाबाहेर मल्लखांबाचा प्रसारास ती उपयोगी ठरेल, अशी प्रतिक्रिया मल्लखांबातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी व्यक्त केली.

‘‘मी जेव्हा या खेळामध्ये काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा केंद्र शासनाची मल्लखांबाला मान्यताही नव्हती. यानंतर आम्ही अनेक राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन केले. अनेक राज्य संघटना स्थापन करून त्या नोंदणीकृत करून मल्लखांब महासंघाला संलग्न केल्या. एवढे करूनही मान्यता मिळण्यास अडचणी येत होत्या. प्रत्येक देश आपापल्या खेळाला पुढे आणण्यासाठी पुढाकार घेत असतो, पण आपल्याकडून मल्लखांबासाठी तसे प्रयत्न केले जात असल्याचे दिसत नव्हते. मात्र, आता मल्लखांबाला चांगले दिवस आले आहेत. खेलो इंडियामध्ये मल्लखांबाचा समावेश झाला. मल्लखांबाच्या राष्ट्रीय विजेत्यांणा दरमहा दहा हजारप्रमाणे वर्षांला एक लाख २० हजारांची शिष्यवृत्ती सुरू केली. मल्लखांबाची १०० केंद्रे उभी केली. मल्लखांबाचे साहित्य देण्यासोबतच प्रशिक्षकांचीही नियुक्ती केली. आता मुले विमानाने खेलो इंडियाच्या स्पर्धेला जातात. आम्ही मुलींचा मल्लखांबही सुरू केला व आज देशभरात मुलींचा सहभाग वाढलेला दिसतो,’’ असे देशपांडे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पहिल्या दिवशी भारताचा दबदबा! फिरकीपटूंनी इंग्लंडला २४६ धावांत रोखले; यजमानांच्या १ बाद ११९ धावा

‘‘मला पुरस्कार मिळाल्याच्या बातमीने खूप आनंद झाला आहे. मात्र, माझ्या यशात अनेक जणांचे योगदान आहे. श्री समर्थ व्यायाममंदिराचे संस्थापक व्यायाममहर्षी प्रल्हाद लक्ष्मण काळे गुरुजी यांनी मला मल्लखांबाची गोडी लावली. तसेच मला येथे पाठविणारे माझे आई-वडील, तसेच मला कायम पािठबा देणारी माझी पत्नी सुखदा व माझी दोन्ही मुले ओंकार व अदिती यांचे माझ्या यशात खूप मोठे योगदान आहे. माझी दोन्ही मुले राष्ट्रीय विजेती होती. अदितीला शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. माझे सहकारी ज्यांनी मला सहकार्य केले व त्यांच्यामुळेच इतकी वर्षे मी सातत्याने काम करू शकलो. सध्या एक सशक्त व समर्थ भारत स्थापन करण्यासाठी आपल्याला मल्लखांबाचा उपयोग करायचा आहे,’’ असेही देशपांडे म्हणाले.

देशपांडे यांची ओळख

’ दादरच्या शिवाजी पार्क येथील श्री समर्थ व्यायाममंदिराचे मानद प्रमुख प्रशिक्षक आणि मानद प्रमुख कार्यवाह.

’ विश्व मल्लखांब महासंघाचे संस्थापक संचालक व मानद महासचिव म्हणून दोन जागतिक अजिंक्यपद स्पर्धाचे आयोजन.

’ अनेक देशांत राष्ट्रीय मल्लखांब संघटना स्थापन करण्यात मोठा वाटा, मल्लखांबाची राष्ट्रीय पुस्तिका तयार करून आंतरराष्ट्रीय पंचवर्गाची सुरुवात.

’ जगातल्या ५२ देशांतील मल्लखांबप्रेमींना मल्लखांब प्रशिक्षण दिले असून, आशिया, अमेरिका आणि युरोप या तीन खंडांमध्ये अनेक मल्लखांब कार्यशाळा घेतल्या.

’ मार्गदर्शन केलेल्यांपैकी पंधरा शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू, तीन शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक, एक अर्जुन पुरस्कार विजेती खेळाडू.

’ महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार आणि जीवनगौरव या पुरस्कारांचे मानकरी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A memorable day for mallakhamb uday deshpande reaction to being awarded the padma shri award amy
First published on: 26-01-2024 at 06:51 IST