प्रशांत केणी

‘‘माझे वडील मला नेहमीच यक्षासारखे वाटतात.. त्यांचा सामना करणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक ठरायचे. मी वयाने वाढलो आहे, पण ते कधी वाढणार हे मला माहीत नाही,’’ हे शब्द युवराज सिंगने आपल्या निवृत्तीच्या पत्रकार परिषदेत जड अंत:करणाने उच्चारले. त्यावर उत्तरही मंगळवारी त्याला मिळाले. योगराज म्हणाले की, ‘‘मी अत्यंत कडक वागलो, अशी तुझी धारणा आहे. पण मला काही तरी जगासमोर सिद्ध करायचे होते. तू मला समजून घेशील अशी आशा आहे!’’

कर्करोगासारख्या आजारावर आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर मात करणाऱ्या लढवय्या युवराज सिंगने वयाच्या २०व्या वर्षी क्रिकेट कारकीर्दीला प्रांरभ केला. अनेक सुवर्णक्षण त्याने भारतीय क्रिकेटला दाखवले. परंतु सध्याची त्याची कामगिरी भारतीय क्रिकेट आणि ‘आयपीएल’मध्ये स्थान मिळवण्यासाठी पुरेशी नसल्यामुळे काळाची पावले उचलून त्याने निवृत्तीचा मार्ग पत्करला.

योगराज या क्रिकेटवेडय़ा बापाच्या स्वप्नांतून युवराज क्रिकेटपटू म्हणून घडू शकला. युवराजच्या वडिलांना म्हणजेच योगराज यांना १९८१च्या न्यूझीलंड दौऱ्यात वेलिंग्टनची पहिली कसोटी खेळता आली. या कसोटीत योगराज यांनी दुसऱ्याच षटकात एका अप्रतिम आखूड टप्प्याच्या चेंडूवर जॉन राइटला तंबूची वाट दाखवली. मग कपिलच्या षटकात जॉन रीडने पूल केलेला चेंडू सीमारेषेपाशी अडविण्याच्या प्रयत्नात योगराज यांच्या डाव्या डोळ्याला चेंडू बसला आणि रक्त वाहू लागले. पण ते खचले नाहीत. त्याच दुखापतीसह पुढची १० षटके त्यांनी टाकली. या जखमेचे गांभीर्य वाढल्यामुळे ते दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकले नाहीत. पण ११व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून त्यांनी रिचर्ड हॅडलीच्या वेगवान माऱ्याचा सामना केला. ती कसोटी भारताने ६२ धावांनी गमावली. त्यानंतर भारतीय संघातून त्यांना वगळण्यात आले. हे दु:ख अनावर झाल्यामुळे त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. न्यूझीलंडहून योगराज आपल्या वडिलांसाठी छान सूट घेऊन आले होते. घरच्या मैदानावर आपण जेव्हा भारतासाठी खेळू तेव्हा वडील हाच सूट घालून येतील, हेच स्वप्न त्यांनी मनोमनी पाहिले होते. पण ते पूर्ण झाले नाही. योगराज यांनी मग आपल्या सर्व बॅटस्ना अग्नी दिली. सहा वर्षांच्या छोटय़ाशा कारकीर्दीत सहा एकदिवसीय सामने फक्त त्यांच्या वाटय़ाला आले. मग २२ वर्षांनंतर मोहालीत त्यांच्या मुलाने न्यूझीलंडविरुद्धच कसोटी पदार्पण केले.

१२ डिसेंबर १९८१ या दिवशी युवराजचा जन्म झाला. तेव्हाच युवराजला क्रिकेटपटू म्हणून घडवण्याचा निर्णय योगराज यांनी घेतला. युवीला बालपणी स्केटिंग, टेनिस हे खेळ आवडायचे. परंतु एके दिवशी योगराज यांनी युवराजला ठणकावून सांगितले की, ‘‘तू देशासाठी क्रिकेट खेळून माझे अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचे आहेस.’’ वडील आपल्याकडून काय अपेक्षा करीत आहेत, याची त्याला मुळीच कल्पना नव्हती. मग योगराजचे वागणेच बदलले. घराच्या अंगणातच त्यांनी नेट्स बांधले. सिमेंटची खेळपट्टी आणि प्रकाश व्यवस्थाही करून घेतली. ते दररोज एक नवी बॅट मुलाला आणून द्यायचे. त्यामुळे घरात बॅट्स आणि ग्लोव्हजची संख्या विपुल होती. तसेच सरावाचे बरेच चेंडू घरभर विखुरलेले असायचे. युवराज मैदानावर सहा तास आणि रात्री घरी चार तास क्रिकेटचे धडे गिरवायचा. योगराजला वेड लागले आहे आणि तो मुलाची पिळवणूक करतोय असे लोक आणि नातेवाईक म्हणू लागले. पण त्यांनी कसलीच पर्वा केली नाही. युवराजची कारकीर्द आपल्याप्रमाणे घडू नये, तर व्हिव्हियन रिचर्डस्, क्लाइव्ह लॉइड, सुनील गावस्करप्रमाणे त्याने महान क्रिकेटपटू व्हावे. मग वडिलांसाठी आणलेला तोच सूट घालून क्रिकेट सामना पाहीन, ही एक त्यांची इच्छा होती. ती युवराजने पूर्ण केली.

क्रिकेटपटू म्हणून मुलाला घडवतानाच योगराज यांनी चित्रपटात अभिनय करायला प्रारंभ केला. १५० हून अधिक पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका करणाऱ्या योगराज यांचे मग पत्नी शबनम सिंगशी पटेनासे झाले. मग या दोघांनी घटस्फोट घेतला. सुसाट वेगाने गाडी चालवणे, हा योगराज यांचा छंद. त्यामुळे एका इसमाला जखमी केल्याप्रकरणी २००४ मध्ये त्यांना सहा महिने तुरुंगवास झाला. त्यानंतर जेसिका लाल हत्येप्रकरणातील आरोपींमध्येही त्यांचे नाव होते.

चित्रपटांच्या मायावी दुनियेत असतानाही युवराज नावाचा हळवा कोपरा योगराज जपून आहेत. वडिलांशी माझे अजिबात पटत नाही, असे युवराजने जगासमोर सांगितले. हे वास्तव जरी असले तरी बापाच्या अधुऱ्या स्वप्नांतूनच मुलाच्या तळपत्या कारकीर्दीचा जन्म झाला आहे..