अॅशेस मालिकेतील पर्थ कसोटीत फिक्सिंगचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट युरोपमधील इंग्रजी वृत्तपत्राने केला असला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने याबाबतचा कोणताही पुरावा हाती आलेला नाही असे म्हटले आहे. तिसऱ्या कसोटीत फिक्सिंगचा किंवा कोणत्याही खेळाडूचा बुकी किंवा फिक्सरशी संपर्क असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे आयसीसीने म्हटले आहे.

अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली असतानाच दुसरीकडे युरोपमधील ‘द सन’ या वृत्तपत्राने स्पॉट फिक्सिंगचे वृत्त दिल्याने जगभरात खळबळ उडाली होती. ‘सन’च्या पत्रकारांनी स्टिंग ऑपरेशन केले होते. यात दोन भारतीय वंशाच्या बुकींनी स्पॉट फिक्सिंग कसे करता येते यावर भाष्य केले होते. मैदानातील खेळाडू याबाबत बुकींना कसा इशारा देतात याचाही त्यांनी उलगडा केला होता.

‘सन’च्या वृत्ताची दखल घेत आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी समितीने चौकशीला सुरुवात केली. प्राथमिक चौकशीत अद्याप फिक्सिंगचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे आयसीसीने स्पष्ट केले. फिक्सिंगचा प्रयत्न हे गंभीर प्रकरण आहे आणि याची आम्ही सखोल चौकशी करु, असे आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी समितीच्या प्रमुखांनी सांगितले. दुसरीकडे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रमुखांनी आम्हाला आमच्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथनेही या वृत्तावर आश्चर्य व्यक्त केले. मी ती बातमी वाचली. फिक्सिंगला मैदानात जागा नाही हे निश्चितच आहे. पण असा काही प्रयत्न झाल्याचे मला वाटत नाही, असे त्याने आवर्जून सांगितले.

‘सन’च्या स्टिंग ऑपरेशनमधील दोन्ही बुकींनी आयपीएल आणि अन्य क्रिकेट लीगमधील फिक्सिंगवरही खुलासा केला आहे. त्यामुळे आता बीसीसीआय देखील याची दखल घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.