आशिया कपमध्ये श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात तमिम इक्बालने एका हाताने फलंदाजी करत लढवय्या वृत्तीचे दर्शन घडवले. तमिम इक्बालच्या हाताला सामन्यादरम्यान दुखापत झाली असून दुखापत झालेली असतानाही तो पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. एका हातानेच फलंदाजी करत त्याने संघाचा डाव पुढे नेला.

सहा देशांचा सहभाग असलेल्या आशिया कप स्पर्धेचा प्रारंभ शनिवारी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने झाला. बांगलादेशची फलंदाजी अनुभवी तमिम इक्बाल, शकिब-अल-हसन आणि मुशफिकुर रहीम यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून होती. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्यात षटकात लकमलच्या चेंडूवर फटका मारताना तमिम इक्बालचा अंदाज चुकला आणि चेंडू त्याच्या हातावर आदळला. यात तमिमच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीत तमिमच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे तमिम इक्बाल आशिया कपला मुकणार हे स्पष्ट झाले होते.

दुसरीकडे मैदानात सामना सुरु होता. इक्बाल २ धावांवरच ‘रिटायर्ड हर्ट’ झाला होता. तर पहिल्याच षटकांत दोन फलंदाज माघारी परतले होते. त्यामुळे बांगलादेश संकटात होता. मात्र, मुशफिकूर रहीमने १४४ धावांची दिमाखदार खेळी केली. त्याला मोहम्मद मिथूनने ६३ धावांची खेळी करत मोलाची साथ दिली. या दोघांनी संघाचा डाव सावरला. मात्र, मोहम्मद बाद झाला आणी ही जोडी फोडण्यात लंकेच्या गोलंदाजांना यश आले.

मोहम्मद मिथून बाद झाला त्यावेळी संघाच्या ३ बाद १३४ धावा झाल्या होत्या. यानंतर तीन फलंदाज अवघ्या ४० धावांमध्येच माघारी परतले. बांगलादेशची अवस्था ६ बाद १७५ अशी झाली. मुशफिकूर रहीमने एकतर्फी किल्ला लढवत संघाला २०० चा पल्ला गाठून दिला. संघाचा नववा फलंदाज बाद झाला त्यावेळी बांगलादेशची स्थिती ९ बाद २२९ अशी होती. यानंतर तमिम इक्बालने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रहीमला साथ देण्यासाठी तमिम चक्क मैदानात फलंदाजीसाठी उतरला. त्याने एका हातानेच फलंदाजी केली.

मुशफिकूर रहीमनेही परिस्थितीनुसार खेळी केली. त्याने एकेरी धावा काढणे टाळले. यामुळे तमिमला फक्त एकाच चेंडूचा सामना करावा लागला. शेवटी रहीम १४४ धावांवर बाद झाला आणि तमिम २ धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशचा डाव २६१ धावांवर आटोपला.