श्रीकांत, लक्ष्य, शुभांकर यांचे कझाकस्तानविरुद्ध एकेरीत विजय

किदम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन, शुभांकर डे यांनी एकेरीत विजयाची नोंद केल्याने भारताला आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत कझाकस्तानवर ४-१ असा मोठा विजय नोंदवता आला. याबरोबरच भारताच्या उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

माजी अव्वल मानांकित श्रीकांतकडून या स्पर्धेत मोठय़ा अपेक्षा आहेत. कारण ऑलिम्पिकसाठी लागणारी जागतिक क्रमवारीदेखील उंचावण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग होणार आहे. श्रीकांतने अपेक्षेप्रमाणे कझाकस्तानच्या डिमित्रिय पेनारिनला २१-१०, २१-७ असे अवघ्या २३ मिनिटांत नमवले. युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने आर्टर नियाझोव्हचा २१-१३, २१-८ असा अवघ्या २१ मिनिटांत पराभव केला. शुभांकर डे याने खैतमुरात कुलमाटोव याला २१-११, २१-५ असे २६ मिनिटांत पराभूत केले. दुहेरीत बी. साईप्रणीत याला चिराग शेट्टीसोबत खेळताना मात्र पराभव पत्करावा लागला. नियाझोव आणि पेनारिन जोडीकडून साईप्रणीत-चिराग जोडीला २१-१८, १६-२१, १९-२१ पराभव स्वीकारावा लागला. मात्र दुहेरीच्या अन्य लढतीत एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिल यांनी निकिता ब्रागिन आणि खैतमुरात कुलमाटोव या जोडीवर २१-१४, २१-८ असा विजय मिळवला.

‘ब’ गटात समाविष्ट असणाऱ्या भारताची आता गुरुवारी मलेशियाविरुद्ध लढत आहे. ‘करोना’ विषाणू संसर्गामुळे चीन आणि हॉँगकॉँग या देशांना फिलिपिन्सने स्पर्धेसाठी प्रवेश दिलेला नाही.

‘करोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवरभारताचा पुरुष बॅडमिंटन संघ मोठय़ा धाडसाने या स्पर्धेत सहभागी झाला आहे. या स्पर्धेत भारताचे मुख्य लक्ष्य पदक जिंकणे आणि ऑलिम्पिकच्या दृष्टीने जागतिक क्रमवारीतील गुणांची कमाई करणे हे आहे.