भारताची २५ वर्षीय टेनिसपटू अंकिता रैनाने महिलांच्या एकेरी स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. यासह अंकिता टेनिसमध्ये पदक मिळवणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. २००६ साली सानिया मिर्झाने दोहा एशियाडमध्ये रौप्य तर २०१० गोंझाऊ एशियाडमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. अंकिता रैनाला उपांत्य फेरीच्या सामन्यात चीनच्या झ्यँग शुईकडून ४-६, ७-६ अशा पराभवाचा सामना करावा लागला.

अंकिताने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हाँग काँगच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर ६-४, ६-१ अशी मात केली होती. मात्र उपांत्य फेरीत चीनच्या प्रतिस्पर्धी खेळाडूसमोर तिची डाळ शिजू शकली नाही. सामन्याच्या मध्यंतरी तब्येत बिघडल्यामुळे अंकिताला वैद्यकीय मदतही घ्यावी लागली. मात्र या सर्वांवर मात करुन अंकिताने जिगरबाज खेळ केला.