शिवानी नाईक

जकार्ता, इंडोनेशिया

१९९० साली एशियाड स्पर्धांमध्ये कबड्डीचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळपासून आतापर्यंत भारताने कबड्डीत आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. मात्र इंडोनेशियात सुरु असलेल्या १८ व्या एशियाड स्पर्धांमध्ये भारताच्या गडाला इराणने हादरे दिले. भारताच्या पुरुष संघाना उपांत्य सामन्यात इराणने पराभवाचा धक्का दिला, तर महिला संघाला अंतिम फेरीत इराणच्या महिलांकडून हार पत्करावी लागली. भारतीय संघाच्या या पराभवामुळे दोन हक्काच्या सुवर्णपदकांवर आपल्याला पाणी सोडावं लागलं. एका खेळाला जन्म देणाऱ्या देशाचं अबाधित वर्चस्व मोडून काढत सुवर्णपदक जिंकणं ही सोपी गोष्ट नाही, मात्र इराणने गेल्या काही वर्षांच्या अथक प्रयत्नांच्या जोरावर ही गोष्ट साध्य करुन दाखवली आहे. एशियाडमधील इराणच्या महिला संघाने रचलेल्या सुवर्णअध्यायात एक पान भारताचं ही आहे. इराणच्या महिला संघाच्या प्रशिक्षक शैलजा जैन यांचा इराणच्या विजयात मोलाचा वाटा आहे.

६१ वर्षीय शैलजा जैन या मुळच्या महाराष्ट्राच्या, नागपूरमध्ये त्यांचा जन्म झाला. लहानपणीच शैलजा यांना आपल्या आईकडून कबड्डीचं बाळकडू मिळालं होतं. लग्नानंतर आपल्याला खेळण्याची परवानगी मिळेल या अटीवर शैलजा जैन यांनी होकार दिला होता. लग्नानंतर शैलजा यांच्या सासरच्या मंडळींनी NIS (National Institute of Sports) मध्ये प्रवेश घेण्यासाठी शैलजा यांना आर्थिक मदत केली. NIS मध्ये प्रशिक्षकपदाच्या अर्जासाठी मुलाखत देताना शैलजा जैन यांनी आपल्या ३ महिन्यांच्या मुलीला एकटं सोडावं लागलं होतं. Indian Express वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शैलजा यांनी आपली कहाणी सांगितली.

इराणच्या महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षक शैलजा जैन

 

२००८ साली सर्वात प्रथम इराणने शैलजा यांना प्रशिक्षकपदाची ऑफर दिली. मात्र योग्य मानधन देत नसल्यामुळे शैलजा यांनी ती नाकारली. यानंतर २०१४ साली शैलजा NSI मधून निवृत्त झाल्या, २०१६ सालात इराणने शैलजा यांच्या सर्व अटी मान्य करत व्हिजासाठी लागणारी सर्व कादगपत्र उपलब्ध करुन दिली, आणि शैलजा इराणला रवाना झाल्या. इराणच्या महिलांना कबड्डीच्या प्राथमिक गोष्टींचं प्रशिक्षण देण्यासाठी बराच वेळ लागल्याचं शैलजा म्हणाल्या. “बचावादरम्यान समोरच्या खेळाडूचा घोटा पकडताना आपली पोजीशन कशी असावी, मांड्या पकडत असताना तुमचा मागचा पाय पुढे यायला नको यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी मला त्यांना शिकवाव्या लागल्या. मात्र इराणच्या महिला खेळाडू तंदुरुस्त असतात, त्यामुळे त्यांनी कबड्डीतले बारकावे लवकर आत्मसात केले.” शैलजा आपल्या संघाचं कौतुक करत होत्या.

अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाच्या उजव्या बाजूतल्या कमकुवत बाजू शैलजा जैन यांनी अचुक हेरल्या. यानंतर त्यांनी इराणच्या संघातील दोन महत्वाच्या चढाईपटूंना मैदानात उतरवलं, आणि यानंतर मैदानात सर्व गोष्टी भारतीय संघाच्या विरुद्ध घडत गेल्या. उजव्या बाजूने इराणच्या चढाईपटूंनी हल्ला करायला सुरुवात केल्यानंतर भारताची बचावफळी पुरती कोलमडली, आणि याचा पुरेपूर फायदा इराणने उचलला. भारतीय संघाला प्रशिक्षण देण्याबद्दल विचारलं असता शैलजा म्हणाल्या, “जर भारतीय संघाने मला योग्य पद्धतीने विचारलं असतं तर मी त्यांची नक्की मदत केली असती. शेवटी भारत हा माझाच देश आहे, माझ्या देशाबद्दल मला प्रेम असणं स्वाभाविक गोष्ट आहे. मात्र मी इराणच्या संघाला प्रशिक्षण देते यासाठी माझ्याकडे गुन्हेगाराच्या नजरेतून पाहिलं गेलं.”

भारतीय कबड्डी संघाला प्रशिक्षण देण्यात आपल्याला कसलीही अडचण नसल्याचं शैलजा म्हणाल्या. मात्र प्रशिक्षणात संघटनांचा हस्तक्षेप मला चालणार नाही. इराणमध्ये माझ्या सहीशिवाय अंतिम १२ जणांचा संघ निवडला जात नसल्याचं शैलजा यांनी स्पष्ट केलं. सध्या भारतीय अमॅच्युअर कबड्डी संघटनेवर दिल्ली उच्च न्यायालयाने प्रशासकाची नेमणूक केली आहे. त्यामुळे कबड्डी संघटनेवर जनार्दनसिंह गेहलोत आणि डॉ. मृदूल भदोरिया यांच्या असलेल्या एकाधिकारशाहीला धक्का बसला आहे. एशियाडमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाचं मनोधैर्य खचलेलं आहे, त्यामुळे हॉकीप्रमाणे संघटनेच्या राजकारणात कबड्डीची परवड होऊ नये अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी करत आहेत.