मुंबईच्या सात वर्षांच्या राहिल मल्लिकने तायच्युंग, तैवान येथे झालेल्या दहाव्या आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ७ वर्षांखालील गटात सुवर्णपदक पटकावले. १३२६ मानांकन असलेल्या राहिलने मलेशियाच्या आमिर अमिरुल फैझला नमवत स्पध्रेत अव्वल स्थान राखले.
या स्पर्धेत आशिया खंडातील अव्वल २० बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या राहीलला दुसऱ्या फेरीत निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र या पराभवातून शिकत राहीलने शानदार पुनरागमनासह जेतेपदावर कब्जा केला. स्पर्धेतील अन्य भारतीय खेळाडू अर्जुन सिद्धार्थने पाचवे स्थान पटकावले.
१३ वर्षांखालील मुलींच्या गटात पोटलुरी श्रीपथाने जेतेपद पटकावले. ९ वर्षांखालील गटात गुंजाळ चोपडेकरने जेतेपदाची कमाई केली. ११ वर्षांखालील गटात बौमिनी मोनिका अक्षयाने अव्वल स्थान मिळवले.
‘‘राहील गेल्या दोन वर्षांपासून कुलदीप व्हाटवर यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता तो खेळतो. एवढय़ा लहान वयात त्याला असलेली बुद्धिबळाची आवड आम्हालाही अचंबित करणारी होती,’’ असे त्याची आई रुपाली मल्लिक यांनी सांगितले.